गोष्ट जुन्या काळातील आहे.स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे . तेव्हा फर्स्टक्लासमध्ये वेगवेगळे कुपे असत . एका कुपे मध्ये समोरासमोर दोन कोच व कुपेला स्वतंत्र दरवाजा असे.(अजूनही थोड्या फार फरकाने अशा स्वरूपाची स्वतंत्र कुपेची रचना आहे असे मला वाटते) पलीकडे कॉरिडॉर असे व त्यातून  ये जा होत असे. 

बॅरिस्टर शामराव अत्यंत नावाजलेले वकील होते .ते काही कामानिमित्त मुंबईहून पुण्याला जात होते.ते एकटेच असल्यामुळे त्यांनी संपूर्ण कुपे रिझर्व केला नव्हता .ते त्यांच्या सीटवर बसून आरामशीरपणे चिरूट ओढत होते .त्यांना  चिरुटाची राख वारंवार झटकण्याची सवय होती.दादरहून गाडी सुटता सुटता एका स्त्रीने त्यांच्या कुपेत प्रवेश केला .तिने आखूड फ्रॉक घातला होता .ती देखणी व गोरीपान अँग्लोइंडियन स्त्री होती.त्या काळी ब्रिटिश राज्य असल्यामुळे अँग्लो इंडियन लोकांचा व इंग्लिश फाड फाड बोलणार्‍यांचा बऱ्याच जणांना वचक वाटत असे. गाडी स्टेशनमधून बाहेर पडली .तिने तिची छोटी बॅग  बाजूलाच ठेवली होती.बॅगेतून वर्तमानपत्र काढून तिने वाचनाला सुरुवात केली .पेपर अर्थातच इंग्रजी टाइम्स होता .शामराव शांतपणे चिरूट ओढत होते .थोड्या वेळाने तिने पेपर बाजूला ठेवला व ती शामरावांजवळ गप्पा मारू लागली .गप्पा अर्थातच इंग्लिशमध्ये होत्या .बोलता बोलता सहज तिने शामराव काय  करतात. त्यांची सांपत्तिक स्थिती कशी आहे.ते पुण्याला कशासाठी जात आहेत वगैरे  माहिती सहज गोळा केली .ते नामांकित वकील आहेत एका तासासाठी ते हजारो रुपये घेतात .हे त्या चाणाक्ष बाईच्या लक्षात आले .पार्टी मालदार आहे हे तिच्या लक्षात आले.शामरावानाही काहीतरी गडबड होणार आहे असा अंदाज आला.

थोड्याच वेळात तिचा नूर पालटला .तिने अडचणीत आहे असे सांगून काही हजार रुपये त्यांच्याजवळ मागितले .वेटर चहाचा ट्रे घेऊन आला त्यावेळी त्यांनी आपले पाकीट बाहेर काढून पैसे दिले होते.त्या चाणाक्ष बाईने त्यांच्या पाकिटात हजार हजाराच्या नोटा पाहिल्या होत्या. तिने मला दहा हजार रुपये पाहिजेतच असे थोड्या वेगळ्या टोनमध्ये करारीपणेने सांगितले. श्यामरावांनी अर्थातच पैसे देणार नाही आपली ओळख  नाही वगैरे सांगितले .त्यावर तिने याचा परिणाम चांगला होणार नाही .तुमची सर्व किर्ती धुळीला मिळेल वगैरे दमदाटी  सुरू केली .श्यामरावांनी मी तुमच्या धमकीला भीक घालत नाही. पैसे मिळणार नाहीत असे ठामपणे सांगितले .तिने जरा चढ्या आवाजात याचा परिणाम चांगला होणार नाही तुम्ही माझ्यावर अत्याचार करण्याचा, अतिप्रसंग करण्याचा ,प्रयत्न केला असे मी सांगेन अशी धमकी दिली .कोणत्याही परिस्थितीत काय वाटेल ते होवो त्या हलकट (चीप) बाईच्या धमकीला दाद द्यायची नाही असे श्यामरावांनी ठामपणे मनाशी निश्चित केले होते.श्यामरावांचे शांतपणे चिरूट ओढणे चालूच होते .शामरावांनी मगाचपासून जाणीवपूर्वक किंवा विसरतेपणी  चिरूट झटकणे थांबविले होते .शामराव धमकीला दाद देत नाहीत असे पाहिल्यावर तिने तिचा फ्रॉक खालून व वरून फाडला .व त्यांना शेवटचे विचारले कि तुम्ही पैसे देता कि नाही ?मी साखळी ओढेन .आरडा ओरडा करीन .पोलीस केस होईल . मग तुमची कीर्ती धुळीला मिळेल. अशी धमकी दिली .तिला वाटले की आता तरी शामराव आपल्याला पैसे देतील .शामराव शांत होते. त्यांनी निक्षून नाही म्हणून सांगितले.तुला काय करायचे ते कर, तुझ्या धमकीला मी भीक घालीत नाही,तुझ्या सारख्या हलकट बाईला मी काहीही झाले तरी पैसे देणार नाही , असे म्हणून ते शांतपणे चिरूट ओढत राहिले .

शामराव कोणत्याही परिस्थितीत पैसे देणार नाहीत हे पाहिल्यावर तिला राग व चीड आली आणि तिने साखळी ओढली .गाडी थांबली .गार्ड आला.पोलिसही आले .तिने अतिप्रसंगाचा बनाव व कांगावा उत्तम प्रकारे केला. पंचनामा झाला.पोलिसांच्या पद्धतीप्रमाणे शामराव बसलेली जागा, त्यांचे कपडे ,बाईचे कपडे,कुपेची एकूण स्थिती ,कपडय़ांची स्थिती,चहाचा ट्रे ,या सगळ्याची पद्धतशीर नोंद, पंचनाम्यात करण्यात आली.पंचनामा करताना शामराव ओढीत असलेला चिरूटही एका डबीमध्ये बंद करुन ठेवण्यात आला. 

शामराव प्रसिद्ध वकील असल्यामुळे ही बातमी मराठी व इंग्रजी सर्व पेपरमध्ये हेडलाईन्स स्वरूपात दिली गेली.लोकांना चघळण्यासाठी काही कारण मिळाले.आता शामराव यातून कसे सुटतात ते कोणालाही कळेना.त्यांंची वकिलीची सनद जाणार.त्यांची बदनामी झालीच आहे ती आणखी होणार. त्याशिवाय जी शिक्षा होईल ती अलाहिदा इत्यादि बातम्या पसरल्या.त्या बाईने धमकी देवून पैसे मागितले वगैरे सर्व हकीगत जी श्यामरावांनी पंचनाम्यामध्ये सांगितली होती ती सर्वांनाच माहीत झाली होती .शामरावानी काही केले असो किंवा नसो त्यांनी पैसे द्यायला हवे होते असे सर्वांचे मत होते. उच्चभ्रू वर्तुळात कोर्टाच्या बारमध्ये वगैरे याची खमंग चर्चा सुरू झाली .शामराव शांत होते ते फक्त कुणी काही विचारले की मंद स्मित करीत .

कोर्टात केस उभी राहिली रोजच्या रोज पानेच्या पाने मजकूर पेपरमध्ये येऊ लागला .गार्ड, पोलीस, ती बाई, इत्यादींच्या साक्षी झाल्या .श्यामरावांनी उलट साक्ष घेताना पुढील मुद्दे स्पष्ठ केले .जर त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांचे कपडे चुरगळले असते .चहाचा ट्रे अस्ताव्यस्त झाला असता .किटली कपबश्या फुटल्या असत्या .दंगा मस्ती झाल्याचे काही ना काही परिणाम शामरावांच्या कपडय़ांवर व कुपेमध्ये दिसणे आवश्यक होते .  गार्ड व पोलिसांनी आम्ही कुपेमध्ये गेलो त्यावेळी शामराव शांतपणे बसलेले होते.व चिरूट ओढीत होते असे सांगितले .जर दंगा मस्ती झाली असती तर कपडे चुरगळले असते. चिरूटाची राख कपड्यांना लागली असती.चिरूट कुठच्या कुठे नाहीसा झाला असता .वगैरे मुद्दे त्यांनी उलट साक्षीमध्ये स्पष्ट केले. त्या बाईने धमकी देवून पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला असेहि स्पष्ट केले.पैसे देत नाही असे पाहिल्यावर तिने स्वतःच तिचा फ्रॉक फाडून साखळी ओढली वगैरे हकिगत कोर्टाला सांगितली .एकूण साक्षी पुराव्यावरून शामराव निर्दोष आहेत असे शंभर टक्के सिद्ध होण्यासारखी परिस्थिती दिसत नव्हती. श्यामरावांनी काही तरी आगळीक केली असावी असा संशय निर्माण होण्याइतपत एकूण साक्षी पुरावे यांची स्थिती होती.

दुसर्‍या  दिवशी पोलीस इन्स्पेक्टरची उलट तपासणी पुढे चालू होणार होती.काय होणार निकाल कसा लागणार याची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती .दुसऱ्या दिवशी रामरावांनी ज्या डबीमध्ये चिरूट बंद केला होता ती डबी मागविली .डबी उघडण्यास सांगितले .त्यात चिरूटाची राख बरीच जमलेली होती .त्यांनी ही राख साधारण किती इंच असावी असा अंदाज पोलिस इन्स्पेक्टरला विचारला .त्यांच्या मताप्रमाणे ती निदान पाउण  ते अर्धा इंच असावी असा होता .त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की चिरूट डबीमध्ये बंद केल्यानंतर तो पेटत राहील का?पोलीस इन्स्पेक्टरने अर्थातच नाही म्हणून सांगितले कारण त्याला ऑक्सिजन मिळणार नाही .दादर स्टेशन ते बाईंनी साखळी ओढली तोपर्यंतचा काळ किती होता असे विचारल्यावर त्याने सुमारे पाउण  तास असे सांगितले .एवढी राख जमण्यासाठी किती वेळ चिरूट  ओढीत राहिले पाहिजे असे विचारल्यावर किमान अर्धा तास असे साक्षी पुराव्यातून सिद्द केले .पोलिस आले त्यावेळी शामराव चिरूट ओढीत होते हेही त्यांनी उलट साक्षीतून सिद्ध केले .साखळी ओढून गाडी थांबेपर्यंत शामराव अर्धातास निश्चलपणे चिरूट ओढीत होते असे सिद्ध झाले.त्या अगोदर जर त्यांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला असता तर नंतर ती बाई अर्धा तास साखळी ओढण्यासाठी का थांबली असाहि प्रश्न निर्माण झाला.याचाच अर्थ शामरावांनी सांगितलेली सर्व हकिगत खरी आहे व त्या बाईने सांगितलेली सर्व हकीगत बनाव आहे .तिने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला हे निर्विवाद सिद्ध झाले .

श्यामराव प्रसंगावधान राखून चाणाक्षपणे चिरूटाची राख न झटकता तसेच चिरूट ओढीत बसले आणि त्यामुळे ते त्यांच्या वर आलेल्या संकटातून त्यांच्यावर काहीही डाग न लागता  सहीसलामत  निर्विवादपणे  सुटले .

चिरूटाची राख ती काय ,परंतु तीच शामरावांची सहीसलामत मुक्तता करू शकली.

(ऐकिव माहितीवरून)

२९/११/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel