या मातृसेवनात। या मातृकामकाजी
वाटे मनातकाया। झिजुदे सदैव माझी

परि जोर ना जराही। संकल्पशक्ति नाही
मनिचे मनी तरंग। जाती जिरून पाही

मम जीवनात देवा। येवो वसंतवारा
गळू देत जीर्ण पर्णे। फुटु दे नवा धुमारा

शिरु देत मनात जोम। शिरु दे मतीत तेज
करण्यास मातृसेवा। उठु देच जेवि वीज

खेळो वसंतवात। मज्जीवनी अखंड
करुदेच मातृसेवा। अश्रांत ती उदंड

असु दे सदा मदीय। मुखपुष्प टवटवीत
असु दे सदा मदीय। हृत्कंज घवघवीत

तोंडावरील तेज। आता कधी न लोपो
आपत्ति आदळोत। अथवा कृतांत कोपो

दृष्टीमध्ये असू दे। नव दिव्य ब्रह्मतेज
वाणीतही वसू दे। माझ्या अमोघ आज

पायांमध्ये असू दे। बळ अद्रि वाकवाया
हातामध्ये असू दे। बळ वज्र ते धराया

हसु दे विशंक जीव। पाहून संकटांना
निश्चित जाउ दे रे। तुडवीत कंटकांना

निर्जीव मी मढे रे। पडलो असे हताश
चढु दे कळा मुखाला। करु दे कृती करांस

हातून अल्प तरि ती। सेवा शुभा घडू दे
न मढ्यापरी पडू दे। चंडोलसा उडू दे

चैतन्यसिंधू तू रे। दे दिव्य जीवनास
जरी मृत्यू तो समोर। विलसी मुखी सुहास्य

संजीवनांबुधी तू। संजीवनास देई
दे स्फूर्ति जळजळीत। नैराश्य दूर नेई

तू एक शक्ति माझी। तू एक तारणारा
जे दीन हीन त्यांची। तू हाक ऐकणारा

हतजीव-जीवनांच्या। रोपास कोण पाळी
तू एक वाढविवी। तूचि प्रबुद्ध माळी

हृदयी बसून माझ्या। फुलवी मदीय बाग
मातापिता सखा तू। गुरु तूच सानुराग

फुलतील वाळवंटे। हसतील शुष्क राने
नटतील भू उजाड। गातील पक्षि गाणे

जरि त्वत्कृपा-वसंत। येईल जीवनात
चंडोलसा उडेन। संस्फूर्त गात गात

त्वत्स्पर्श अमृताचा। मजला मृता मिळू दे
मम रोमरोमि रामा। चैतन्य संचारु दे

आता सदा दयेचा। सुटु दे वसंतवारा
फुलु देच जीवनाचा। जगदीश भाग सारा

-धुळे तुरुंग, मे १९३४

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel