रडण्याचे ध्येय
केव्हा मी कृतिवीर होइन, न ते काहीच माते कळे
डोळ्यांतून मदीय नित्य विपुला ही अश्रुधारा गळे
स्वप्ने खेळवितो किती निजमन:सृष्टीत रात्रंदिन
ना येती परि मूर्तीमंत करण्या नाही मला तो गुण।।
या माझ्या हृदया बघा उघडुनी मी ध्येयवादी असे
ध्येयालाच अहर्निश स्मरतसे चित्ती दुजे ना वसे
ध्येये मात्र मदंतरी विलसती, ध्येयेच ती राहती
माझे लोचन अश्रुपूर्ण म्हणुनी खाली सदा पाहती।।
इच्छाशक्ति जया नसे प्रबळ ती जी पर्वता वाकवी
यच्चित्ता लघुही विरोध रडवी नैराश्य ज्या कापवी
त्याला ध्येय असून काय? रडतो निर्विण्ण रात्रंदिन
वाटे ध्येयविहीन कीट असणे, तेही बरे याहुन।।
ध्येये जी धरिली उरी न मम का ती? चित्त त्या का भुले?
देवा! ध्येय मदीय नित्य रडणे हे का असे निर्मिले?।।
-अमळनेर, १९२७
द्विविध अनुभव
भरला हा अंधार। सारा भरला हा अंधार।।
क्रूर पशू हे हिंसक भेसुर
गदारोळ करितात भयंकर
थरथरते भीतिने मदंतर
निरखुनि हे कातार।। सारा....।।
वाघ गुरगुरे अंगावरती
भुजंग फूत्काराते करिती
विंचू करिती नांगी वरती
नाहि कुणी आधार।। सारा....।।
डोळे जैसे खदिरांगार
झिंज्या पसरुन भेसुर फार
धावुन येई हा अंगावर
पिशाच्चगण अनिवार।। सारा....।।
काटे रुतती टुपती दगड
भुजंग विंचू दिसती रगड
मरुन जाइन राहिन ना धड
डोळ्यां लागे धार।। सारा....।।
भयभीतीने मी गांगरत
शतदा मार्गी मी अडखळत
जखमा होती वाहे रक्त
केला हाहा:कार।। सारा....।।
पाहुनि दु:खाचा बाजार
माझे झाले मन बेजार
अंगी उरला अल्प न जोर
पडली गात्रे गार।। सारा....।।
तीक्ष्ण नखांनी फाडफाडुन
दातांनी चावुन कडकडुन
टाकतील मजला खाऊन
करितिल वाटे ठार।। सारा....।।
झंजावाते जैसे पान
कांपे, तेवी मी बलहीन
प्रभुजी, कोणा जाऊ शरण
वदवे ना मज फार।। सारा....।।
हे विश्वंभर करुणासागर
हे परमेश्वक परमोदार
शेधित आहे तुझेच दार
तार मला रे तार।। सारा....।।