( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी तिचा संबंध नाही.तसा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा )                

किती तरी वेळ सुजाता टक लावून क्षितीज रेषेकडे पाहात बसली आहे असे वाटत होते .प्रत्यक्षात ती कुठेच बघत नव्हती.आपल्या ब्लॉकच्या गच्चीत ती बसली होती .तिच्या गच्चीतून पुढे मोकळे पटांगण असल्यामुळे व त्या पलीकडे बैठे बंगले असल्यामुळे  क्षितिजरेषा दिसत असे. प्रत्यक्षात ती शून्यात बघत होती. थंडीचे दिवस होते सध्याकाळी चार वाजताच ऊन कोवळे झाले होते.विचारांच्या आवर्तात ती सापडली होती.विचार करून करून शेवटी ती पुन्हा जिथे सुरुवात झाली तिथे येत होती .

कुणाला मत द्यावे ते तिला कळत नव्हते. असा प्रसंग आपल्यावर येईल असे तिला वाटले नव्हते .उगीच आपण निवडणूक लढवली असे तिला वाटू लागले होते .ती ज्या शिक्षण संस्थेत काम करीत होती तिच्या सेक्रेटरीची निवड करायची होती .सेक्रेटरी पदासाठी दातार व परांजपे असे दोन लाईफ मेंबर उभे होते.शिक्षण संस्था तशी जुनी होती .संस्था स्थापन होऊन पन्नास वर्षे झाली होती . संस्थेच्या शाळा व महाविद्यालये अनेक शहरात होती .ही संस्था शिक्षक चालवीत असत .शिक्षकांमधून आजीव सदस्य निवडले जात .नवीन आजीव सदस्य वर्तमान आजीव सदस्य निवडत असत. बऱ्याच शिक्षण संस्थांमध्ये राजकीय पुढारी व धनिक यांचे नियंत्रण असते.या संस्थेत बाहेरील कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे किंवा धनिकांचे नियंत्रण नव्हते .देणग्या घेऊन कॉलेज हॉल यांना देणगीदारांची नावे दिली जात.देणगीदारांच्या  नावाने शिष्यवृत्ती दिली जाई.समारंभामध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जाई.मानाने निमंत्रण दिले जाई.मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नियंत्रण स्वीकारले जात नसे.शिक्षकांनी शिक्षणाच्या पवित्र हेतूने चालवलेली संस्था असे हिचे पहिल्यापासून स्वरूप होते.  हे आजीव सदस्य  संस्था चालवत असत..नवीन नेमणुका,विस्तार, नवीन कॉलेज, शाळा,यांची स्थापना इत्यादी सर्व निर्णय हे मंडळ घेत असे .अध्यक्ष नावापुरता असे. त्याला विशेष अधिकार नसत.जर समसमान मते झाली तर अध्यक्ष महत्त्वाचा ठरत असे.सेक्रेटरी (सचिव )तसे होणार नाही याची काळजी घेई.बहुशः तो अध्यक्षाला आपल्या खिशात टाकीत असे.सेक्रेटरी सर्व सत्ता अधिकार आपल्या हातात केंद्रित करीत असे.म्हटली तर लोकशाही म्हटली तर सचिवाची एकाधिकारशाही अशी परिस्थिती असे.

तर उद्या सचिवाची निवडणूक होणार होती .घटनेप्रमाणे लाइफ मेंबर्सची संख्या मर्यादित अकरा ठेवण्यात आली होती.यातील एक अध्यक्ष असे.कोणत्याही सूचनेवर मतदानाचा  अधिकार दहा जणांना असे .जर दोन्ही बाजूला समसमान मते झाली तरच अध्यक्ष आपला अधिकार वापरीत असे.यामध्ये आणखी एक गुंतागुंत होती.शिक्षकानी अनेक वर्षे प्रयत्न करून त्यांना लाइफ मेंबर्समध्ये प्रतिनिधित्व पाहिजे असा आग्रह धरला होता . जरी आजीव सदस्य शिक्षक असले तरी आजीव सदस्य नसलेल्या शिक्षकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी प्रतिनिधित्व पाहिजे होते .शेवटी निरनिराळ्या शाळा कॉलेजेस विद्याशाखा यांच्यातून निवडणुकीद्वारे शिक्षकांना प्रतिनिधित्व देण्यात आले. हे शिक्षक प्रतिनिधी सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची मते मागण्या मांडू शकत असत .परंतु अनेक वर्षे त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता .मतदानाचा अधिकार अकरा आजीव सदस्यांपुरता मर्यादित होता.शेवटी शिक्षकांनाही मतदानाचा अधिकार पाहिजे ही गोष्ट आजीव सदस्यांनी मान्य केली .शिक्षक प्रतिनिधींनी आपल्यातून दोन शिक्षक त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे व ते मतदानात भाग घेतील अशी रचना करण्यात आली .संचालक मंडळामध्ये मतदानाचा अधिकार असणारे शिक्षक प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येत असत .

शेवटी आज अशी परिस्थिती होती .अकरा आजीव सदस्य अधिक  प्रतिनिधीमधून  निवडून दिलेले दोन प्रतिनिधी असे तेराजण सर्व निर्णय घेत असत .सुजाता त्या दोन प्रतिनिधीमधील एक होती. तर तिचा नवरा जय दुसरा प्रतिनिधी होता .दातारांच्या बाजूला पांचजण होते.तर परांजपे यांच्या बाजूला पांचजण होते .तिचा नवरा जय आणि ती यांची मते जर दातारांना मिळाली असती तर दातार सात मते मिळवून विजयी झाले असते .

जय दाताराना मत देणार हे नक्की होते.जयचे वडील दातारांचे जीवश्चकंठश्च मित्र होते .जयची आई अगोदरच मृत्यू पावली होती .जयच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दातारांनी जयचे संगोपन केले होते. शिक्षण पुरे झाल्यानंतर त्यांनी त्याला या शिक्षण संस्थेमध्ये नोकरीही दिली होती. दातार हे जयला वडिलांच्या जागी होते .त्यामुळे त्याचे मत दातारांना नक्की होते.अशा प्रकारे दातार व परांजपे यांना सहा व पांच मते होत होती.सुजाता कुणाला मत देणार यावर कोण निवडून येणार हे अवलंबून होते . जर तिने दातारांना मत दिले तर दातार निसंशय निवडून आले असते .परांजपे यांना मत दिल्यास दोघांचीही समसमान मते झाली असती .अशावेळी अध्यक्ष कुठे मत देईल त्यावर बरेच काही अवलंबून होते .अध्यक्ष,परांजपे यांच्या बाजूचे होते. अध्यक्षाना परांजपे यांनी मॅनेज केले आहे असे सर्वजण म्हणत असत.हल्लींचे सचिव दातार होते.परांजपे यांना दातारांकडून सत्ता हिसकावून घ्यायची होती.त्यांच्या डोक्यात विस्ताराच्या  ज्या कल्पना होत्या त्यांना दातारांनी विरोध केला होता .आपण सचिव झाल्याशिवाय त्या कल्पना आपल्याला अंमलात आणता येणार नाहीत याची त्यांना खात्री होती .ते सत्ताकांक्षी होते .डावपेच आखण्यात परांजपे कुशल होते .ते महत्त्वाकांक्षी होते.तरुणही होते .दातारही काही कमी नव्हते परंतु ते आता जुनाट झाले होते .लढत अटीतटीची होती . दातारांनी सुजाताला तुझे मत मला नक्की आहे असे मी गृहीत धरले आहे.असे सांगितले होते .तर परांजपे यांनी सुजाताच्या घरी जावून ती आपल्यालाच मत  देईल असा विश्वास प्रगट केला होता. परांजपे तिचे आते भाऊ होते.सुजाताला भाऊ नसल्यामुळे ती परांजपे यांना नेहमी राखी बांधत आली होती .एकीकडे भाऊ व दुसरीकडे मानलेला प्रेमळ सासरा अशा द्वंद्वात ती सापडली होती.  सकाळी दोघांचेही फोन आले होते .आज रात्री व उद्या सकाळी दोघेही फोन करतील याची तिला खात्री होती .अप्रत्यक्ष अशा प्रचंड मानसिक दबावाखाली तणावाखाली ती होती. दोघांनीही सुजाता त्यांनाच मत देईल असा विश्वास प्रगट केला होता .सुजाता नुसते हां हां करण्याशिवाय आणखी काही बोलू शकली नव्हती .काय करावे कुणाला मत द्यावे तिला काहीही सुचत नव्हते . त्याचाच ती मघापासून विचार करीत होती. 

जय व सुजाता यांचा प्रेमविवाह होता .  दातारांनी सुजाताला सून मानले होते.लग्नानंतर तिचे सणवार व कौतुक दातार व त्यांची पत्नी यांनी केले होते.एवढेच नव्हे तर केतनच्या जन्माच्या वेळी तिचे सर्व कौतुक दातार काका काकूंनी केले होते .तिचे व जयचे दातारांशी असलेले संबंध लक्षात घेता तिने दातारांना मत देणे योग्य ठरले असते .

परंतु घरगुती संबंध लक्षात घेऊन मतदान करणे सुजाताला पटत नव्हते.ती मोठी तत्वनिष्ठ होती .नाते आपल्या ठिकाणी,मत आपल्या इच्छेनुसार असे तिला वाटत होते .

दातार आता निवृत्त झाले होते .त्यांचे विचार जुने होते .आहे ते व्यवस्थित राखावे, जमले तर त्यात वाढ करावी,असे त्यांचे मत असे.कोणतेही साहस करायला ते तयार नसत .देणग्या मिळविण्याध्येही ते कमी पडत होते हा गेल्या पाच वर्षांचा अनुभव होता .

सचिवाची निवडणूक दर पाच वर्षांनी होत असे.

परांजपे तरुण होते .त्यांचा स्वभाव साहसी व आक्रमक होता.शिक्षणसंस्थेच्या विस्ताराच्या दृष्टीने परांजपे जास्त योग्य असे  तिचे मत होते .इतर शिक्षण संस्थांचा विचार करता आपली शिक्षण संस्था अग्रभागी असावी असे वाटत असेल तर परांजपे अपरिहार्य आहेत असे तिचे मत होते.परांजपे यांच्याजवळ नवीन नवीन कल्पना आहेत .अथक परिश्रम करण्याची त्यांची तयारी आहे . अनेक क्षेत्रातील ओळखीमधून संस्थेसाठी जास्त जास्त देणग्या ते  मिळवू शकतात याची तिला खात्री होती .देणग्यांशिवाय पैशाशिवाय कोणताही विस्तार अशक्य होता. परांजपे प्राचार्य असलेल्या कॉलेजमध्ये ती काम करत होती.त्यांच्या विरुद्ध मतदान केल्यास त्याचा कुठेतरी अनिष्ट परिणाम होण्याची भीती होती .परांजपे यांना मत दिल्यास ती थोड्याच वर्षात विभागप्रमुख होऊ शकली असती .विभागप्रमुख तीन वर्षांनी निवृत्त होणार होते .सीनिअॉरिटी व क्वॉलिफिकेशन या दोन्ही दृष्टींनी ती पात्र होती.जरी ती तत्त्वनिष्ठ असली तरी एकूण माणसाच्या वर्तनात कुठेतरी स्वार्थ असतोच.

थोडक्यात स्वार्थ, तत्व व संस्थेचे दीर्घकालीन हित ,या तीनही दृष्टींनी परांजपे यांना मत देणे तिला योग्य वाटत होते .उद्या कुणाला मत द्यावे त्याचा परिणाम काय होईल याचाच विचार ती किती तरी वेळ दुपारी करीत होती.रविवार असल्यामुळे जय जेवून दुपारी  डाराडूर झोपला होता. आणि ती बसल्या बसल्या शून्यात नजर लावून विचार करीत होती .परांजपे यांना मत दिल्यास जय काय म्हणेल याचीही तिला थोडी भीती वाटत होती.

जय तसा नाही तो उदारमतवादी आहे याची तिला मनोमन खात्री होती.

तरीही कुठेतरी तिला आशंका वाटत होती.तिचे हृदय दातारांना मत द्यावे असे सांगत होते.तर तिची तर्कशक्ती बुद्धी स्वार्थ  परांजपे यांना मत द्यावे असे सांगत होता.हे कोडे कसे सोडवावे तेच तिला कळत नव्हते. विचाराचे एक वर्तुळ पुरे करून ती पुन: पहिल्या ठिकाणी येत होती. 

तिला चक्रव्युहामध्ये अडकल्या सारखे वाटत होते .यातून यशस्वीपणे कसे सुटावे ती तिला कळत नव्हते.थोडक्यात तिचा अभिमन्यू झाला होता .

जय मगाच उठला होता .आपल्याच तंद्रीत हरवलेल्या सुजाताकडे तो टक लावून बघत होता.तिच्या मनात कसले विचार चालले असतील त्याची त्याला कल्पना होती.त्याने चहा केला व तो चहा गॅलरीत घेऊन आला.जयच्या हातात चहाचे कप बघून ती दचकली.पुढ्यांतील मोबाइलमध्ये तिने किती वाजले ते बघितले .चार वाजलेले पाहताच आपण दोन तास विचारांच्या आवर्तात फिरत होतो हे तिच्या लक्षात आले .जयला तिने मला का हाक मारली नाही म्हणून विचारले.त्यावर जयने मंदस्मित करीत तुझी समाधी भंग करण्याचे पाप मला करायचे नव्हते म्हणून सांगितले .पुढे त्याने एवढा कसला विचार करीत होतीस म्हणून विचारले .त्यावर तिने चाचरत विशेष काही नाही असे म्हटले.जयला तिचा स्वभाव माहिती होता. ती कसला विचार करीत होती ते त्याने केव्हाच ओळखले होते .

तिला आश्वस्त करण्यासाठी तो पुढे म्हणाला .तू मला काय वाटेल याचा विचार मुळीच करू नकोस .मी तुझ्यावर कधीच जोरजबरदस्ती केली नाही. परांजपे सचिवपदासाठी जास्त योग्य उमेदवार आहेत हे मलाही माहित आहे .तरीही मी माझे मत काकाना देणार .तू योग्य उमेदवाराला मत दे. माझी काहीही हरकत नाही.तू स्वतंत्र आहेस.तुझे स्वातंत्र्य हिरावण्याचा मला अधिकार नाही.मनसुबाही नाही .मी त्या टाईपचा नवरा नाही .मतदान करताना मी काय म्हणेन हे मनात बाळगू नकोस. अर्थात दातार काकांना मत दिले तर मला आत कुठे तरी ते आवडेल हे नक्की .

जय वरवरचे बोलत नाही याची तिला खात्री होती.तरीही दातारकाकाना मत दिल्यास तो सुखावेल हे तिला माहित होते.आताच त्याने ते स्पष्टपणे बोलून दाखविले होते .परांजपे यांना मत दिल्यास तो किंचित नाराज होईल हेही तिला आतून जाणवत होते.तिलाही एकदा दातारकाकांना मत द्यावे असे वाटत होते.तर एकदा परांजपे यांना मत द्यावे असे वाटत होते.तिच्या डोक्यात नुसता गुंता व गोंधळ झाला होता.आपण निवडणुकीला उभे राहायला नको होते असे तिला वाटत होते .सहाध्यापकांनी भरीला घातले म्हणून ती तयार झाली होती .

*आणि आता संपूर्णपणे चक्रव्युहामध्ये फसली होती*

३१/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel