(  ही गोष्ट संपूर्णपणे काल्पनिक आहे .नाव स्थान इत्यादी गोष्टींमध्ये कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

कुठल्याही रिकाम्या जागेवर काहीना काही उगवते .खडकाळ जागेतही बारीक बारीक गवत किंवा काही झुडपे उगवतात. ही जागा जिथे आता बिल्डरने बांधकाम सुरू केले होते तिथे तर माती होती  .तिथे तर झाडे झुडपे मोठे वृक्ष असायला हवे होते .परंतु तिथे काहीही उगवत नव्हते .सर्व जमीन ओसाड होती.त्यामुळेच सर्वजण ती जमीन शापित आहे असे म्हणत असत .

बिल्डरने जमीन विकत घेतली .तिथे काही भव्य उभारण्याची योजना आखली .कॉर्पोरेशनमध्ये जाऊन बांधकामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविल्या.प्लॅन अर्थातच संमत करून घेतला होता. कामाला सुरुवात झाली.दिवस रात्र काम करून शक्य तितक्या लवकर त्याला आपली भव्य योजना साकार करायची होती .पहिले काही दिवस कोणतीही अडचण नाही असे वाटत होते .आपण ज्या अफवा ऐकल्या त्या सर्व अफवाच होत्या असे बिल्डरला वाटू लागले होते .

इतके दिवस पडीत जमिनीत अकस्मात काम सुरू झाल्यामुळे तेथील अतृप्त आत्मे कदाचित गांगरले असावेत .त्या जागेला कामाच्या पद्धती प्रमाणे चारी बाजूनी पत्रे लावले होते. ट्रक खोदकामाची यंत्रसामुग्री सहज आंत बाहेर येऊ जाऊ शकेल इतका मोठा दरवाजा ठेवला होता.पाया घेण्यासाठी  खोदाई करीत असताना पाच फूट खोदाई झाल्यावर एक दिवस अकस्मात चारी बाजूनी स्पष्ट दिसण्यासाठी टाकलेले प्रकाशझोत रात्री बारा वाजता अकस्मात बंद झाले . दिवे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले .कुठेही काहीही तांत्रिक अडथळा अडचण दिसत नव्हती .दोष सापडत नव्हता.आजूबाजूचे सर्व दिवे चालू होते .विजेचे तात्पुरते मीटर बसविलेले पॅनेलही वीज आहे असे दर्शवित होते. काम अर्थातच थांबविण्यात आले होते .किंबहुना वीज नसल्यामुळे प्रकाश नसल्यामुळे काम अपरिहार्यपणे  थांबले होते.

सर्व कामगार सकाळी कोणता दोष आहे ते पाहू म्हणून आपापल्या घरी निघून गेले .पहाटेचे तीन वाजल्यानंतर केव्हातरी अकस्मात प्रकाशझोत सुरू झाले .सर्व कामगार कामावरून निघून गेल्यामुळे वॉचमनला वीज बंद करावी लागली .

दुसऱ्या दिवशी ही सर्व हकीगत मुकादम, मॅनेजर व मालक यांना सांगण्यात आली .काहीतरी न सापडणाऱ्या  तांत्रिक दोषांमुळे वीज गेली असावी काळजी करण्याचे कारण नाही असे म्हणून सर्वांनी तिकडे दुर्लक्ष केले .त्या रात्री पुन्हा बरोबर बारा वाजता वीज गेली .आता मात्र सर्वजण सावध झाले .सर्व वायरिंग काळजीपूर्वक तपासून इलेक्ट्रिशियन कोणताही दोष नाही म्हणून सांगत होता.असे असूनही वीज मात्र बरोबर बारा वाजता गायब होत होती . ती पुन्हा तीन वाजता येत होती .

रात्रीचे काम थांबविण्यात आले .पहाटे तीन ते रात्री बारापर्यंतच कामाच्या वेळा विभागून देण्यात आल्या .पुन्हा जोरात काम सुरू झाले .त्या अदृश्य शक्तीला किंवा शक्तीना रात्री बारा ते तीन ही वेळ रिकामी हवी होती.खड्डा  दहा फूट खोल झाल्यावर त्याला पाणी लागले .येथे दहा फुटाखाली पाण्याचा झरे होते.खड्डा पाण्याने भरून जाऊ लागला .पाच सहा मजबूत पंप बसवून पाणी बाहेर काढून टाकण्याला सुरुवात झाली .खड्डा रिकामा झाल्याशिवाय खोदकामाला सुरुवात करता येत नव्हती.खड्डा सतत रिकामा राहील हे पाहावे लागत होते .

पंप ,रात्री बारा ते तीन वीज नसल्यामुळे चालू शकत नसत.तेवढ्यात खड्डा पाण्याने भरून जात असे .आणखी पंप लावून खड्डा रिकामा करण्याचे काम सुरू करण्यात आले .त्यामुळे सकाळी आठपर्यंत कामाला सुरुवात करता येत नसे . सकाळी आठ ते रात्री बारा एवढ्या वेळेतच काम करता येत होते .पाणी उपसणारे पंप सतत सुरू राहावेत त्यांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून,जनरेटर बसविण्यात आला .शेजारच्या सोसायटीमधून वीज विकत घेण्यात आली .तरीही रात्री बारा वाजता वीज अकस्मात बंद होत असे .जनरेटर बंद पडे.फॉल्ट कुठेही सापडत नव्हता. तरीही रात्री बारा ते पहाटे तीन सर्व काम ठप्प होत होते.आणि पुढे आठ वाजेपर्यंत केवळ पाणी उपसण्याचे काम चालत असे .

खड्डा जसजसा खोल  होऊ लागला तसतसे पाणी उपसणाऱ्या पंपांची संख्या वाढवीत न्यावी लागली .एकूण बिल्डरचा पैसा जास्त खर्च होऊ लागला . त्याच्या कागदावर आखलेल्या योजनेप्रमाणे काम पुढे सरकू शकत नव्हते .

एक दिवस आणखी एक चमत्कार झाला .रात्री एक वाजता सर्वत्र अंधार असताना बांधकामाच्या सभोवती लावलेले दक्षिणेकडचे पत्रे कुणीतरी उचकटून फेकून दिले .उचकटून फेकून दिलेले पत्रे दुसर्‍या  दिवशी उभे करण्याचे काम करावे लागे.रात्री पुन्हा कुणीतरी पत्रे उचकटून देत असे . आपल्या वाईटावर असलेला कुणीतरी , भाडोत्री गुंड लावून हे पत्रे उचकटून टाकतो असे बिल्डरला वाटत होते.  त्याने पोलिस कम्प्लेंट केली .त्या गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांनी व्यवस्था केली . बिल्डरने आपलेही बाऊन्सर्स नेमले होते .कुणीही माणसे पत्रे उचकटून फेकून देताना आढळली नाहीत .कोणती तरी अज्ञात शक्ती, अदृश्य शक्ती, अकस्मात सर्व पत्रे उचकटून फेकून देत असे.

बिल्डरने दक्षिणेकडे पत्रे न लावता काम केले तर चालेल का म्हणून परवानगी मिळविण्याचा   प्रयत्न केला .नियमाप्रमाणे काम करताना जागा बंदिस्त असलीच पाहिजे असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे पत्रे बसविणे हे रोजचे एक काम होऊन बसले .खड्डा खोल जात होता  तशी पंपांची संख्या वाढत होती.बिल्डरला अपेक्षेपेक्षा एकूण खर्च भरपूर वाढणार ही कल्पना आली .

तिथे काही कामगारांसाठी सात आठ राहुट्या बांधलेल्या होत्या .काही कामगार परराज्यातून आलेले होते. काही परगावातून आलेले होते. कामगारांसाठी व वॉचमन वगेरे आवश्यक कामगारांसाठी त्या राहुट्या होत्या.

एके रात्री अकस्मात मोठा वारा  सुटला .त्यांच्या सर्व राहुट्या वाऱ्याने उद्ध्वस्त झाल्या.त्याच वेळी त्यांना विजा चमकताना दिसल्या .आजूबाजूच्या बिल्डिंगमधील लोक शांतपणे झोपलेले होते .तिथे वाऱ्याचा मागमूसही नव्हता .वारा वीज वादळ काहीही नव्हते .दुसरीकडे कुठे राहायला जागा नसल्यामुळे ते कामगार व नाईलाजाने वॉचमन तिथे राहत होते .सकाळी त्यांना आपल्या राहुट्या पुन्हा उभ्या कराव्या लागल्या .

एका रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सर्व आपल्या राहुट्यांमध्ये गाढ झोपलेले असताना  त्यांना कुणीतरी उचलून पाण्यामध्ये फेकून दिले.थंडीचे दिवस होते अकस्मात पाण्यात  पडल्यामुळे सर्वजण घाबरून गेले.कित्येक जणांच्या नाकातोंडात पाणी गेले .कुणीही दगावले नाही. कसेबसे सर्वजण काठावर आले.आतामात्र सर्व कामगार घाबरून गेले .आपले सर्व सामान घेऊन ते त्या शापित जागेतून बाहेर पडले . जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे राहू लागले . 

आता तिथे फक्त वॉचमन होता.त्याची रात्री त्या जागेत गस्त घालण्याची हिंमत नव्हती .तो बिचारा रात्री जागेच्या बाहेर दरवाज्यात  खुर्ची टाकून पेंगत बसे.रात्री त्यालाही कामाच्या जागेतून आवाज येत असत .तो घाबरून गेला .त्याने काम सोडले .भरपूर पैसे देऊनही कुणी वॉचमन मिळेना . शेवटी दोन दोन वॉचमन ठेवण्यात आले .त्यांना तिप्पट चौपट पगार कबूल करण्यात आला .बिल्डरचा खर्च वाढतच होता .

एके रात्री खोदकामाचे अवजड साहित्य कुणीतरी उचलून रस्त्यावर आणून ठेविले.सकाळी मंडळी कामावर येतात तो खोदाईचे सामान रस्त्यावर होते .रस्ता त्या अवजड साहित्यामुळे बंद झाला होता .रस्त्यात अडथळा निर्माण केल्याबद्दल त्या बिल्डरवर पोलीस केस झाली .त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला आणखी खर्च करावा लागला .

दिवसा तिथे काहीही गडबड होत नसे .सर्व काही नॉर्मल असे .काम व्यवस्थीत चालत असे .कामात कुणीही अडथळा आणि नसे.रात्री बारानंतर त्या शक्ती जागृत होत . आपल्या जागेवर झालेले आक्रमण त्यांना आवडत नसे .कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते काही ना काही त्रास देत असत .बिल्डर हे काम सोडून देईल आपल्याला पूर्वीप्रमाणे  पुन्हा शांतता मिळेल असा त्यांचा कयास असावा.

नंतर आणखी एक गोष्ट घडू लागली . तिथे काम करणारे लोक अन्यत्र राहत असले तरी काही ना काही कारणाने वारंवार  आजारी पडू लागले.कामाच्या जागी अपघात होऊ लागले .कुणी डंपरच्या खाली आला.कुणी पाण्यात बुडून मेला हे सर्व त्या अज्ञात अशुभ शक्तीमुळे होते याबद्दल सर्वांची खात्री पटली .  कामावर यायला कुणी तयार होईना.काम करण्यासाठी कामगार तंत्रज्ञ यंत्रज्ञ मिळत नाहीसे झाले.  

बिल्डर चिकाटीचा होता .तोही इरेला पेटला होता .वाट्टेल तेवढा खर्च होउदे, हे काम मी पूर्ण करणारच अशी प्रतिज्ञा त्याने केली होती.  एकाअर्थी  त्याचा नाईलाज होता . त्याला गुंतविलेला पैसा दिसत होता .काम अर्धवट सोडून दिल्यास त्याचे प्रचंड नुकसान होणार होते .त्याशिवाय त्याची सर्वत्र बदनामी झाली असती ती वेगळीच.कितीही खर्च वाढला तरी त्याला हाती घेतलेले काम पूर्ण करणे अत्यावश्यक होते .

त्याने पैशाचे भरपूर आमिष दाखविले.परराज्यातून कामगार आणले .त्याच्या एका रिकाम्या पडलेल्या प्लॉटवर तंबू उभारून त्यांची राहण्याची व्यवस्था केली .काम शक्यतो अडणार नाही. जलद गतीने होईल, हे तो कटाक्षाने पाहात होता.

उत्खनन करताना अगोदर सांगितल्याप्रमाणे काही हाडे कवट्या  मिळू लागल्या.निरनिराळया  धातूचे क्रॉसही मिळत होते.ही सर्व बातमी गुप्त ठेवण्यासाठी त्याला आटोकाट प्रयत्न करावे लागत होते .त्यामुळे आणखी खर्च वाढत होता .    

असंख्य अडचणींना तोंड देत त्यावर मात करीत शेवटी खड्डा हवा तेवढा खोल झाला.आता पिलर उभारणीचे व इतर काम सुरू झाले .तिथे होणारे चमत्कार हळूहळू  सर्वत्र पसरले होते .ही जागा आहे तरी कशी म्हणून बघण्यासाठी लोक येत होते . हे एक  प्रेक्षणीय स्थळ झाले होते .

बिल्डरच्या दृष्टीने आनंदाचा भाग एवढाच होता की त्याने अगोदरच तिथल्या जागा विकून पैसे घेतले होते .तिथे होणारा मॉल,  ,सिनेमागृहे,नाट्यगृह, रेस्टॉरेंट्स, इत्यादीसाठी त्याने पन्नास टक्के अॅडव्हान्स अगोदरच घेतला होता .या सर्व कामात प्रचंड पैसा गुंतला होता .या उंच इमारतीवर एक स्वतःभोवती फिरणारे (रिव्हॉल्व्हिंग) रेस्टॉरंट नियोजित होते .सर्व शहराचा नजारा तिथून दिसणार होता.योजना फार चांगली होती .शहराच्या मध्यवर्ती भागात हे सर्व असल्यामुळे लोकांची गर्दी चांगलीच होणार होती .

हळूहळू त्याच्या योजनेप्रमाणे सर्व काम आकार घेत होते .भव्य चार मजली मॉल तयार झाला.

त्यावर चार सिनेमा थिएटर्स उभी राहिली.  एक सिनेमागृह तर केवळ मराठी सिनेमांसाठी उपलब्ध राहणार होते .

नाट्यगृहाची उभारणी झाली .दिवसातील कोणत्याही वेळी तिथे नाटक होऊ शकले असते .रंगपट, मेकअप रुम व इतर नाट्य सामान ठेवण्याच्या  जागा दोन बांधण्यात आल्या होत्या.एक नाटक स्टेजवर चालू असताना दुसर्‍या  नाटकाचे लोक पूर्ण तयारी करू शकणार होते.पहिले नाटक संपल्यानंतर एका तासात सर्व सेट्स लावून दुसरे नाटक सुरू करता येणार होते.भव्य रिव्हॉल्व्हिंग स्टेज बांधण्यात आले होते. 

एक मोठा कॉन्फरन्स हॉल बांधण्यात आला .पाचशे लोक सहज बसू शकतील असा तो होता .अद्यावत ध्वनी योजना करण्यात आली .भव्य स्क्रीनवर व्हिडिओ दाखवू शकतील अशीही प्रोजेक्टरसह व्यवस्था होती .

दोन मोठी कार्यालये बांधण्यात आली . तिथे लग्न मुंज वाढदिवस किंवा इतर कोणतेही घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रम करता येण्याची व्यवस्था होती .

सर्वात उंचावर रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट होते.त्याचेही काम पूर्ण झाले .सर्व कामांची भरपूर जाहिरात करण्यात येत होती .आता कोणताही त्रास नाही असे सांगण्यात येत होते . रात्री साडेअकराला काम बंद करण्यात येत असे.सकाळी आठला पुन्हा कामाला सुरुवात होत असे .एकदा पाया तयार झाल्यावर झपाट्याने  काम पूर्ण झाले.

सर्व काम पूर्ण झाले .गाजावाजा करून त्याचे उद्घाटनही झाले. मालक थिएटर्स रेस्टॉरंट सर्व व्यवस्थित सुरू झाले .रात्री बारा ते आठ काहीही करायचे नाही हे कटाक्षाने पाळले जात होते .

*त्यांच्या जागेवरील आक्रमणामुळे अशुभ शक्ती नक्कीच चिडल्या होत्या.त्यांच्या सामर्थ्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे ते काहीही करू शकत नव्हते.*

*"ते" आणखी सामर्थ्य मिळवण्याचा प्रयत्न करीत होते . किंबहुना त्यांनी ते सामर्थ्य मिळविले होते .

*ते योग्य संधीची वाट पाहत होते .*

* या लोकांना काही ना काही त्रास दिल्याशिवाय ते गप्प बसणार नव्हते.* 

*त्यांची तुष्टी होणे गरजेचे होते. *

*परंतु याची कल्पना बिल्डर किंवा अन्य लोकांना नव्हती*

(क्रमशः)  

२४/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel