( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

मनोहरपंतांचे बुजगावणे सर्व अनर्थाचे कारण आहे.

ते बुजगावणे आपण नष्ट करू शकलो तर पूर्वीसारखा वांदर चोर व पक्षी यांचा होणारा त्रास विभागला जाईल.

त्या बुजगावण्याची उगाचच भीती निर्माण केली गेली आहे असा विसूभाऊंचा ठाम विश्वास होता.

येनकेनप्रकारेण ते बुजगावणे नष्ट करण्याचा मनसुबा विसूभाऊनी आखला.

प्रताप बुजगावण्याचा नसून त्यात वस्तीला आलेल्या खवीसाचा आहे याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती .

त्याची त्याना कल्पना  असती तर ते त्या बुजगावण्याच्या वाटेला गेले नसते.

परंतु जे व्हायचे असते ते अटळ असते. ते टाळता येत नाही हेच खरे  

विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे.

मनोहर पंतांचे शेजारी विसुभाऊ ही एक कोकणातील खास नंबरी चीज होती.बुटके, किंचित स्थूल शरीर, उन्हाने  रापलेला गौरवर्ण.कंबरेला फक्त पंचा एवढेच शरीरावर वस्त्र.जर परगावी जायचे असेल तर खांद्यावर एक पडशी वजा पिशवी,डोक्यावर काळी टोपी,त्यातून बाहेर डोकावणारी  काळी पांढरी शेंडी.हातात एक जाड सोटा.पायात कर्रर्र कर्रर्र वाजणार्‍या वाहणा.असा त्यांचा थाट होता.अनुनासिक शब्दोच्चार . बोलण्यात कुणाबद्दलही आदर नाही.एकूण कुणाबद्दलही तुच्छतापूर्वक बोलणे .पु ल देशपांडे यांचा अंतू बर्वा जर वाचला असेल तर तुम्हाला विसुभाऊंबद्दल बरीच कल्पना येईल.अहंकारयुक्त बोलणे.मी म्हणजे कोण असा एकूण आव.प्रेम, सौहार्द, मैत्री, आपुलकी, याऐवजी भांडण ,तिरसटपणा व तिरकटपणा, तुच्छता,यांचा अधिवास . कोणत्या ना कोणत्या कारणाने गावातील अनेक लोकांशी त्यांचा तंटा बखेडा होत असे.

असे हे विसुभाऊ मनोहरपंतांचे शेजारी होते.आगराच्या   सीमांपैकी एक सीमा दोघांचीही समान होती.मनोहरपंतांकडे बुजगावणे येण्याअगोदर आणि आल्यावरही त्यांत खवीस रहायला येईपर्यंत होणारे नुकसान दोघांचेही होत होते .चोर, वांदर, पक्षी इ दोन्हीकडेही जात असत.नुकसान कमी जास्त प्रमाणात समसमान होत असे.बुजगावणे आल्यावर आणि त्यात खवीस राहायला आल्यावर विसुभाऊंचे मोठे नुकसान होऊ लागले.नुकसानीचा सर्व भार त्यांच्यावर पडला.दु:ख नुकसानीचे तर होतेच परंतु त्यापेक्षा मनोहरपंतांचे नुकसान नाही आणि आपले मात्र होते याचा त्रास त्यांना जास्त होत होता.

कांहीही असले तरी आपले नुकसान वाचवण्यासाठी त्यांच्यापुढे दोन मार्ग होते.पहिला मार्ग  प्रेमाचा होता .मनोहरपंतांकडे जाणे, त्यांना विनंती करणे आणि त्यांचे बुजगावणे दोन्ही आगरांचा सांभाळ करील,रक्षण करील, अशी व्यवस्था करणे हा होता .दुसरा मार्ग बुजगावणे नष्ट करणे, त्याची मोडतोड करणे,निष्कारण मनोहरपंतांचे शत्रुत्व ओढवून घेणे हा होता .विसूभाऊंची एकूण वक्र चाल पाहता पहिला मार्ग त्यांना सुचणे आणि सुचला तरी त्याची अंमलबजावणी करणे अशक्य होते .  त्यांच्या स्वभावानुसार त्यांची पावले व त्यांची जीभ त्या मार्गाला वळली नसती.    

अजयने बनविलेल्या बुजगावण्याचे प्रताप सर्वत्र पसरले होते.विसूभाऊंनी स्वतःही ते बुजगावणे पाहिले होते.बुजगावणे विचित्र आहे हे दिसत होते.परंतु ते प्रसृत झालेल्या सर्व गोष्टी, कारनामे करू शकेल यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता.तसे ते भुताखेतांवर देवावर विश्वास ठेवत होते परंतु असल्या बुजगावण्यावर त्याच्या कारनाम्यावर विश्वास ठेवीत नव्हते.चोर येवू नयेत म्हणून मनोहरपंतांनी या सर्व अफवा मुद्दाम   पसरवल्या आहेत अशी त्यांची खात्री होती.  यंत्र बसविल्यावर बुजगावणे   हातपाय हलवू शकेल, चालू शकेल,  कदाचित हात थोडय़ाबहुत प्रमाणात लांब होऊ शकतील,याची त्यांना कल्पना होती.परंतु एका धडधाकट माणसाला पकडून त्याला झाडाच्या शेंड्यावर ठेवणे कोणत्याही  बुजगावण्याला शक्य नाही.त्याचप्रमाणे फुटबॉलप्रमाणे लाथ मारून  एखाद्या इसमाला आगराच्या बाहेर,कम्पाउंड बाहेर,   उडविणे  शक्य नाही .किंवा एखाद्या इसमाला पकडून त्याला खुळखुळ्याप्रमाणे हलविणे बुजगावण्याला शक्य नाही.किंवा अकस्मात वीस पंचवीस फूट उंच होणे तर दुसऱ्याच क्षणी एक दोन फूट इतकीच उंची असणे शक्यच नाही.याबद्दल त्यांची शंभर टक्के खात्री होती. 

मनोहरपंतांच्या माणसांनी त्या चोरांना भरपूर प्रसाद दिला असेल .हे सर्व बुजगावण्याने केले असा कदाचित चोरांना संभ्रम निर्माण झाला असेल .कदाचित मनोहरपंतांनी चोरांना व गावांतील कांही हुषार व्यक्तींना पैसे देऊन तशा अफवा पसरावयाला सांगितल्या असतील.कांही असो बुजगावण्याने केल्या असे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी त्याने केल्या नाहीत यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

अफवांमुळे चोर मनोहरपंतांच्या आगरात यायला धजत नाहीत.वांदरांचे काय?(वांदर हा वानराचा अपभ्रंश. लाल तोंडाचे वानर माकड,व काळ्या तोंडाचे वानर वांदर) असा त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला.त्यावर मेलेल्या वांदराची कातडी मनोहरपंतानी कुठुनतरी मिळविली आहे. ती झाडावर टांगून ठेवली आहे . त्यामुळे वांदर येत नाहीत असे त्यांचे उत्तर व समर्थन होते.त्यांनी तशीच मेलेल्या वांदराची कातडी आपल्या झाडावर टांगून पाहिले होते.वांदर त्यांच्या आगरात येतच होते .पक्षी येत नाहीत त्याचे काय असे विचारता पक्षी येतात, येत नाहीत ही अफवा आहे असे त्यांचे उत्तर होते.

एकूण मनोहरपंत हा लबाड मनुष्य आहे.बुजगावणे उभे करून तो अफवा पसरवीत आहे.प्रत्यक्षात त्याने व त्याच्या माणसांनी चोराना तुडविले आहे.चोरांना पैसे चारून बुजगावण्याबद्दल नाना गोष्टी पसरवायला सांगितल्या आहेत.गांवातील लोक त्यावर विश्वास ठेवतात.असे त्यांचे ठाम मत होते.

बुजगावण्याबद्दलचा हा भ्रम दूर केला पाहिजे.जर त्या बुजगावण्याचा आपण चक्काचूर करू शकलो ,जर त्याची मोडतोड करण्यात आपण यशस्वी झालो,जर ते बुजगावणे मोडतोडीमुळे अकार्यक्षम झाले तर सर्वांचाच भ्रमनिरास होईल यावर ते ठाम होते.चोर नंतर मनोहरपंतांकडेही चोरी करू लागतील.नुकसानीचे प्रमाण खूप कमी होईल. फक्त हे कसे करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.ही कामगिरी कुणावर तरी सोपविली तर त्याचा बभ्रा होण्याची शक्यता होती.एक दिवस गुपचूप आपणच मनोहरपंतांच्या आगरामध्ये जावे आणि आपल्या सोट्याने त्या बुजगावण्याचा चक्काचूर करावा असे त्यांनी निश्चित केले.त्यासाठी त्यांनी अमावास्येची रात्र निवडली.अमावास्येला घनदाट काळोख असतो.आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी कोळशाची पूड अंगाला फासली.आपला तो सुप्रसिद्ध सोटा हातात घेतला आणि गुपचूप आवाज न करता, आवाज होऊ नये म्हणून  वहाणा घातल्याशिवाय, मनोहरपंतांच्या अागरामध्ये शिरले.आता त्यांचा सोटा होता आणि ते बुजगावणे होते.  

*जर त्यांना त्या बुजगावण्यामध्ये खवीस राहायला आला आहे याची कल्पना असती तर ते त्या बुजगावण्याच्या वाटेला कदापि गेले नसते.*

*अशा कुटिल हेतूने मनोहरपंतांच्या आगरात रात्रीचे गुपचूप कधीही शिरले नसते.*

*परंतु होणारे टळत नाही हेच खरे.जशी दैवगती तशी बुद्धी. *

(क्रमशः)

२३/४/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel