(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

~ अनिकेत ~

संजना कॉमर्सला जाणार होती .त्याऐवजी मी सायन्सला आलो म्हणून ती सायन्सला आली हे मी केव्हाच ओळखले होते.ते माझ्या लक्षात आले असे जर मी तिच्या जवळ बोललो असतो तर तिला बरे वाटले असते.ती सायन्सला आली म्हणून आपल्या वारंवार भेटी होतात असे तिच्याजवळ बोलावे असे अनेकदा मनात आले परंतु एरवी  चुरूचुरू बोलणारी माझी जीभ का कोण जाणे ती समोर आली की जड पडत असे .अभ्यासविषयक बोलणे असेल तर मी सहज बोलू शकत असे.आणखी कुणाबद्दल बोलणे असेल तर तेही मी सहज बोलत असे.परंतु तिच्या संबंधी बोलणे आले की माझी जीभ रेटत नसे .तिच्या समोर काय किंवा फोनवर काय तिच्याजवळ तिच्याविषयी मला काय वाटते ते सांगता येत नसे .

आम्ही दोघेही बारावी सायन्स चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो .दोघांनीही मेडिकलला अॅडमिशन घेतली .चांगल्या मार्कांमुळे अॅडमिशन घेण्यास अडचण आली नाही .आता आम्ही साडेचार वर्षे एकमेकांसोबत राहणार होतो .पहिलीपासून केवढा दीर्घ प्रवास आम्ही एकमेकांसोबत केला होता .एवढाच प्रवास काय, परंतु पुढेही एकमेकांबरोबर प्रवास करावयाची माझी इच्छा होती परंतु ती तिला कशी कळणार? माझ्या मनात जे आहे तेच तिच्या मनात आहे असे मला अनेकदा जाणवे.अनेकदा प्रत्यक्ष किंवा फोनवर तिच्याबद्दल मला काय वाटते ते बोलावे असे मला वाटे परंतु जीभ काही रेटत नसे.माझ्याशी आणखी कुणी मुलगी जर बोलत असेल जर मी तिच्याशी हसून गप्पा मारीत असेन तर तिचा चेहरा लगेच कावराबावरा होई.तिचा चेहरा आरसपानी पारदर्शक होता .तिच्या मनातील भाव तिच्या चेहऱ्यावर लगेच उमटत असत .

प्रत्यक्ष बोलता येत नाही फोनवर बोलता येत नाही तर तिला पत्र लिहून सर्व काही कळवावे असे वाटत असे.परंतु मायन्याशी गाडी अडत असे.नुसते नाव लिहावे की मागे प्रिय लाडके इत्यादी काही विशेषण जोडावे काही कळत नसे.काही तरी विशेषण वापरून मी पत्र लिहित असे.आणि अर्ध्यावर किंवा माझ्या मताने पत्र पूर्ण लिहून झाल्यावर तिला हे आवडले नाही तर ?या तरशी सर्व गाडे अडत असे.मी लिहिलेले पत्र फाडून टाकीत असे . तिच्या बद्दल काय वाटते ते मला कम्युनिकेट करता येत नव्हते .

~ संजना~ 

वर्षामागून वर्षे चालली होती .आम्ही एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात होतो .मला आत्तापर्यंत एक दोन मुलांनी प्रपोज केलेही होते.मी अनिकेतवर मनापासून सुरुवातीपासून प्रेम करीत असल्यामुळे दुसऱ्या कुणाचे प्रपोजल स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता.मला अनिकेतच्या डोळ्यात, चेहऱ्यावर, त्याचे माझ्यावरील प्रेम ,स्पष्ट दिसत होते. हा ते केव्हा बोलतो त्याची मी वाट पाहत होते .वर्षांमागून वर्षे गेली .आम्ही सतत सोबत होतो परंतू मी ज्याची आतुरतेने वाट पाहात होते ते तीन शब्द काही तो बोलत नव्हता.

आम्ही कित्येक वर्षे रोज भेटत होतो.बोलत होतो.फिरायला जात होतो.सिनेमाला जात होतो .परस्परांच्या भविष्याबद्दल अपेक्षांबद्दल गप्पाही मारत होतो .परंतु तो काही ते तीन शब्द बोलत नव्हता.त्याने बोलल्याशिवाय आपण त्या बाबतीत  बोलायचे नाही असे मी निश्चित केले होते .एमबीबीएसची परीक्षा झाली .आता इंटर्नशिप करायची होती.पोस्ट ग्रॅज्युएट करायचे की नाही ते नंतर ठरविले असते .कुठच्या तरी विषयात स्पेशलायझेशन करावे असे मला वाटत होते.त्या अगोदर माझ्या मनात जे आहे तेच त्याच्या मनात आहे ना याची मला खात्री करून घ्यायची होती .मनोमन खात्री असली तरी कुणीतरी विषयाला तोंड फोडणे आवश्यक होते .आयुष्य संपले तरी हा काही बोलेल असे दिसत नव्हते .शेवटपर्यंत हे असेच चालणार की काय कळत नव्हते .खरे तर कुणीही कुणालाही प्रपोज केले तर काय बिघडले ?मुलानेच मुलीला प्रपोज केले पाहिजे असा हट्ट का ?असा रिवाज का ?हे सगळे तात्विकदृष्टय़ा खरे असले तरी मला मात्र त्याने ते तीन शब्द बोलावे असे वाटत होते .

शेवटी मी एक प्लॅन रचला.

~अनिकेत ~

माझा मित्र त्या दिवशी जी बातमी घेऊन आला त्याने मी हादरलोच.संजनाचे वडील आजारी आहेत.ती एकुलती एक मुलगी आहे .आपल्या डोळ्यासमोर तिचे लग्न व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.तिला पुढे शिकायची इच्छा असूनही तिने लग्नाला होकार दिला आहे .वराकडील मंडळी तिला पुढे शिकायला परवानगी देणार आहेत.मुलगा कोण अशी चौकशी करता तो अमेरिकेत असतो असे कळले .

मी संपूर्णपणे हादरून गेलो .आज बोलू उद्या बोलू असे आता करून चालणार नव्हते .आता किंवा कधीच नाही असा तो समर प्रसंग होता.

मी संजनाचा नंबर लावला.तिकडे रिंग वाजत होती आणि उचल उचल लवकर उचल असे मनात मी म्हणत होतो .शेवटी तिने फोन घेतला.मी तिला ताबडतोब बागेमध्ये भेटण्यास बोलाविले .उद्या आल्ये तर चालणार नाही काय ?असे ती म्हणाली. हे बोलताना ती मनाशीच हसत आहे की काय असा मला भास झाला .मी तिला चालणार नाही आत्ता लगेच ये म्हणून सांगितले .

~संजना~

योजना यशस्वी झाली .बाण अचूक लक्ष्यावर लागला .

मी अाज्ञाधारकपणे लगेच तयारी करून बागेत पोहोचले .

तिथे तो माझी आतुरतेने वाट पाहात होता .

* मला आवडणारे कपडे त्याने घातले होते .*

:मला आवडणारा केवड्याचा  मंद सुगंध येत होता.*

* पारंपरिक  प्रेमिकांच्या थाटात त्याने गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल माझ्या हातात दिले .*

*आणि मी कित्येक वर्षे वाट पाहात असलेले ते तीन शब्द तो बोलला.*

(समाप्त)

१३/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel