अशा वेळी विजेचे बटण सुरू करायचे नसते हे मला आठवले .जास्त गॅस जमला असल्यास स्पार्किंगमुळे भडका उडतो .

गॅसचा वास येत होता .मी चाचपडत जाऊन पहिल्यांदा गॅस खालून बंद केला.नंतर पुन्हा खोलीत जाऊन बॅटरी आणली.मी बॅटरी आणण्यासाठी बेडरूममध्ये गेलो तेव्हा त्या आकृती तिथून गायब झालेल्या होत्या .ती भुते असोत किंवा देवदूत असोत किंवा आणखी कुणी असोत त्यांनी माझा जीव वाचवला,यात शंका नाही. गॅस खराच दोनवर होता.तोही मी नीट केला.सर्व खिडक्या उघडून दिल्या .दुसऱ्या खोल्यातील पंखे सुरू केले .त्यामुळे गॅस खिडक्यांतून बाहेर निघून जाईल अशी कल्पना होती.तोपर्यंत उजाडले होते .

त्यांच्या बोलण्यावरून ते या बंगल्यातच राहात होते.आम्हा दोघांना किंवा आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना किंवा  लहान मुलांना ते केव्हाही दिसले नव्हते.त्यांनी आम्हाला केव्हाही त्रास दिला नव्हता .

सौभाग्यवती आलेली असताना पुन्हा असाच एक प्रसंग घडला . पावसाळी दिवस होते .पावसाची नुकतीच सुरुवात झाली होती .दणादणा पाऊस पडत होता . ढगांचा गडगडाट होत होता . विजा चमकत होत्या.आमच्या बंगल्यांमध्ये भूमिगत वीजपुरवठा नव्हता .गच्चीवरून बंगल्यात वीज घेतलेली होती .इन्सुलेशन खराब झाल्यामुळे वीज गच्चीतील पाण्यात उतरली होती . गच्चीत पाणी साठले होते.जर अाम्हा दोघांपैकी कुणीही गच्चीत गेले असते तर त्याचा तात्काळ मृत्यू झाला असता.

यावेळी सौभाग्यवतीला काही दिसले नाही .परंतु आकाशवाणीप्रमाणे सारखे तेच तेच सात शब्द कानावर आदळत होते . ~गच्चीत जाऊ नका पाण्यात वीज उतरली आहे .~थोड्या थोड्या वेळाने सारखे तेच शब्द कानावर आदळत होते.तो आवाज लहान मोठा होत होता .मी रविवार असल्यामुळे सकाळी जरा जास्त झोपलो होतो.ही सकाळी लवकर उठली होती .तिच्या कानावर स्वयंपाकघरात सारखे वरील शब्द जोरजोरात आदळत होते .शेवटी ही मी झोपलो होतो तिथे आली.तिने मला तिला जे सारखे ऐकायला येत होते ते सांगितले. तिला तिच्या कानांमध्ये काही समस्या आहे की काय असे वाटत होते .

एरवी एखादे वेळी मी तिच्याकडे दुर्लक्ष केले असते .तिला काहीतरी भास होत आहेत असे सांगितले असते .परंतु मला अगोदरचा गॅसचा अनुभव होता.ती उगीचच घाबरेल म्हणून मी तिला त्याबाबत काहीही सांगितले नव्हते .मी लगेच आमच्या प्रकल्पावरील इलेक्ट्रिकल इंजिनिअरला बोलवून घेतले .त्याचप्रमाणे एमएसईबीलाही कळविण्याची व्यवस्था केली.गच्चीत खरोखरच वीज उतरली होती.आमच्या जिवाला धोका पोचला असता.कदाचित सौभाग्यवती घाबरेल म्हणून त्यांनी तिला दर्शन दिले नसावे .केवळ सतत आवाज आल्यामुळे ती सतर्क होऊन माझ्याकडे आली .

असा आवाज कुणाचा असे मला तिने विचारले .तू रोज देवाची पूजा करतेस.त्या देवानेच आपल्याला धोका पोचू नये म्हणून आकाशवाणीप्रमाणे असा आवाज दिला असावा  अशी मी तिची समजूत घातली .आपल्या घरात दोन अदृश्य आत्मे आहेत,हे ऐकून ती घाबरली असती .तिने पुन्हा पुन्हा आकाशाकडे पाहून नमस्कार केला आणि ते प्रकरण तिथेच मिटले. ती नंतर तो प्रकार विसरून गेली.

तिसरा अनुभव आम्ही तिथे असतानाच आला .आम्ही कंपनीने दिलेल्या ज्या बंगल्यात राहात होतो ती कॉलनी नवीनच होती.तिथे साप किरडू असे सरपटणारे प्राणी काही वेळा निघत असत.दिवाळीचे दिवस होते .नातवंडांना सुट्या होत्या .सुट्टीमध्ये सर्वजण आमच्याकडे आले होते .खेळ गप्पा मौजमजा चालली होती .दिवाळी असल्यामुळे मुलाने येतानाच फटाके फुलबाजे भुईनळे इत्यादी उडविण्याचे दारूसामान आणले होते .बंगल्यातील एका खोलीत ते कोपऱ्यात ठेवलेले होते .मुले धावत धावत खोलीत जात तिथून काही दारू सामान घेऊन बाहेर येत.ते संपले की पुन्हा आत जात .असे त्यांचे सारखे आतबाहेर चालले होते. 

मुले धावत जात असताना  खोलीचा दरवाजा धाडकन लागला .काही केल्या त्यांना तो उघडेना.मुले मला येऊन खोलीचा दरवाजा घट्ट बसला आहे उघडत नाही असे सांगू लागली.मी त्यांच्याबरोबर दरवाजा उघडण्यासाठी जात असताना मला एक भव्य आकृती दिसली .तिने मला खोलीत नाग आहे. दिवा लाव, काळजी घे, म्हणून सांगितले.

मी माझ्या मुलाला हाक मारली .दोन वेताच्या छड्या घेऊन बॅटरी घेऊन आम्ही खोलीत गेलो.मुलांना न उघडणारा दरवाजा आम्हाला आता सहज उघडला .आम्ही दिवा लावला. कोपऱ्यात बॅटरीचा प्रकाश पाडला. दारूसामानाच्या टोपलीवर एक नाग होता.नातवंडांनी जर काळोखात किंवा प्रकाशातही नीट न पाहता  तसाच दारूसामान घेण्यासाठी हात घातला असता तर तो नाग त्यांना डसण्याचा दाट संभव होता.मुले बालंबाल बचावली होती .

एवढी सर्व हकीगत सांगून सदाशिवराव पुढे सर्वांना म्हणाले .आता मला सांगा भुते आहेत की नाहीत?कदाचित तुम्ही समजता तशी ती भुते नसतील, ते देवदूत असतील.त्यांना तुम्ही नाव काहीही द्या .नावाला महत्त्व नाही. 

आपल्याला दिसते तेवढेच विश्व नाही.

आपल्याला अदृश्य असे आत्मे आपल्याच जगात जेथे आपण राहतो तेथे रहात असतील .

आपला आणि त्यांचा संघर्ष होण्याचे काहीच कारण नाही.

केव्हा केव्हा त्यांच्या व आपल्या कक्षा एकमेकांना छेदत असतील .

अश्यावेळी  एकमेक एकमेकांना कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात दृग्गोचर  होत असतील.

*यात अशक्य किंवा अशास्त्रीय काही आहे असे मला वाटत नाही.*

*माणसे जशी चांगली व वाईट असतात.त्याचप्रमाणे अशा अदृश्य योनीमध्ये चांगले व वाईट अश्या व्यक्ती व समूह असणारच.*

*मनुष्य म्हणजे तो जसा चांगला असेल असे नाही किंवा वाईट असेल असे नाही त्याप्रमाणेच इतर योनीमध्येही सरमिसळ असणारच.*

*आता तुम्हीच ठरवा आम्हाला जे भेटले दिसले ऐकायला आले जाणवले ते कोण होते.*

*असा समारोप करून सदाशिवराव घरी जाण्यासाठी उठले .*

*सर्वजण अवाक् होऊन घरी जाणाऱ्या पाठमोऱ्या सदाशिवरावाना पाहात होते .*

(समाप्त )

१/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel