(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे . कुठेही साम्य आढळणार नाहीच.यदाकदाचित  आढळल्यास तो योगायोग समजावा)

खलाशांसह एक जहाज  समुद्रातून वर आलेल्या खडकाजवळ नांगरून ठेवण्याचा खर्च बराच होता .खडक आता स्थिर झाला होता .त्यावर  जर दीपस्तंभ उभारला असता तर खूपच खर्च वाचला असता.सरकारने दीपस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला .भरतीचे पाणी दिवसातून दोनदा ज्या खडकावर येते तिथे ,दहा किलोमीटर समुद्रात जाऊन दीपस्तंभ उभारण्याचा खर्च जरी सुरुवातीला जास्त आला असता तरी दीर्घकालीन विचार करता तेच फायद्याचे ठरणार होते .

खडक स्थिर राहण्याचा संभव किती आहे ?खडकावर दीपस्तंभ उभा करता येईल का? त्याचे वजन खडक पेलू शकेल का?त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतील ?त्यांचे निवारण कसे करावे ?दीपस्तंभ उभारण्यासाठी किती खर्च येईल ?इत्यादी सर्व गोष्टींची छाननी करून त्याचा अहवाल देण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली .यथावकाश समितीचा अहवाल आला. तो लोक प्रतिनिधींनी मान्यही केला आणि  प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली .एकूणसशेऐशी साली नेमलेल्या समितीचा अहवाल येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत एकोणीसशेत्राऐशी साल उजाडले . 

कामाला सुरुवात झाल्यावर एका मागून एक अडचणी येऊ लागल्या .जश्या अडचणी येतील तसे त्यांचे निवारण करावे लागले .बांधकामाचे साहित्य घेऊन येणाऱ्या होड्यांसाठी एक धक्का बांधावा लागला.ज्यावेळी ओहोटी असेल व खडक उघडे पडतील त्याच वेळी काम करता येणे शक्य होते .हल्लींच्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन पाण्यामध्येही पाया घेऊन उभारणी करता येणे शक्य होते .त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री अवाढव्य होती त्याचा खर्च फार मोठा होता .पारंपरिक पद्धतीने बांधकाम करावे की आधुनिक पद्धतीने करावे यावर चर्चा होऊन शेवटी दोहोंचा मध्य साधावा .शक्य तितक्या लवकर आणि कमीत कमी खर्चात दीपस्तंभ उभा करावा असे ठरविण्यात आले .

दीपस्तंभाचा पाया खणताना अडचणी आल्या .पायाची उभारणी करायला सुरुवात केल्यावर तो पाया लगेच कोसळत असे."भुतांच्या बेटावरील" भुताना दीपस्तंभ उभारणे मानवत नाही त्यामुळे ते पाया उचकटून टाकतात.अशी अफवा पसरली.भौतिक अडचणींपेक्षा भुतांच्या अडचणी जास्त त्रासदायक होत्या .भुताच्या अफवेमुळे तेथे काम करण्यासाठी मजूर मिळणे बिकट झाले.जास्त पैसे देऊन  मजूर आणावे लागत होते .असे आणलेले मजूर घाबरून सोडून जाण्याचे प्रमाण फार मोठे होते . 

कल्पनेपेक्षा दगड बराच ठिसूळ होता .त्यामुळे खोलवर पाया घेणे व त्याची मजबुती करणे आवश्यक होते.  सामान घेऊन आलेल्या बोटी उभ्या राहण्यासाठी खडकावर धक्का बराच लांब रुंद बांधण्यात आला .सामान घेऊन आलेल्या बोटी धक्क्यापासून पाण्याची पातळी बरीच खाली असल्यामुळे त्या उभ्या राहात तिथून धक्क्यावर सहज येणे शक्य नव्हते . धक्क्यावरून एक शिडी खाली सोडण्यात येई त्यावरून मजूर वरती येत असत .मजुरांची वाहतूक पणजीपासून खडकापर्यंत करावी लागे.बांधलेल्या धक्क्यावर सामान ठेवले जाई .तसाच एक उंच धक्का जिथे प्रत्यक्ष दीपस्तंभाचे काम चालले होते तिथे बांधण्यात आला होता.त्यावर सर्व सामान ठेवण्यात येई .खडकावर भरतीच्या वेळी पाणी येत असल्यामुळे तिथे सामान ठेवणे शक्य नव्हते .

अशा असंख्य अडचणीना तोंड देत देत दीपस्तंभाचा पाया तर तयार झाला . हा पाया बराच उंच घेण्यात आला होता .भरतीचे पाणी उंच लाटा उसळत असतांनाही दीपस्तंभामध्ये शक्यतो येऊ नये एवढा पाया उंच घेण्यात आला होता . 

शेवटी या उंच पायावर दीपस्तंभाच्या उभारणीला सुरुवात झाली .इथेच अनेक अडचणींना सुरुवात झाली .बांधकामाचे सामान दीपस्तंभामध्ये खालच्या मजल्यावर(पाया जिथे होता त्यावर) ठेवण्यात आले होते.पूर्वी जे मजूर रात्रीचे धक्क्यावर थांबत असत ते आता दीपस्तंभाच्या खालच्या मजल्यावर राहू लागले .

बांधकामाचे सामान कुणीतरी तिथून खाली ढकलून देऊ लागले.तिथून सामान चोरीला जाणे शक्यच नव्हते .पूर्वीही धक्क्यावर ठेवलेले सामान गायब होत असे .वाऱ्यामुळे सामान खाली पडले. लाटेमुळे ते वाहून गेले.असे म्हणता येत असे .इथे तसे काही होण्याचा संभवच नव्हता .पहिला मजला बांधून झाला होता .तळमजल्याला भक्कम दरवाजा होता .तो दरवाजा रात्री कडी कुलूप बंद केला जात असे .तरीही सामान नाहीसे होत असे .मजूर सामान चोरून होडीतून मुख्य जमिनीवर पाठवितात एवढे एकच स्पष्टीकरण पटण्यासारखे होते .परंतु काही  सामान नंतर केव्हातरी लाटेबरोबर पुन्हा दीपस्तंभाखाली येऊन लागत असे.जर मजूर चोरी करतात असे म्हणावे तर तेच मजूर भुतावर आळ जाण्यासाठी त्यातील काही  सामान मुद्दाम खाली टाकून देतात असे म्हणावे लागले असते .सत्य काय आहे ते कळणे फार कठीण होते. 

हा सर्व भुतांचा खेळ आहे असे सर्वजण म्हणू लागले.मजूर सामान चोरीत असतील याला काही पुरावा सापडत नव्हता .आम्ही रात्रीचे दीपस्तंभावर थांबणार नाही असे मजूर म्हणून लागले . कुणीतरी रखवालदार ठेवणे भागच होते .एका ऐवजी दोन रखवालदार ठेवण्यात आले.त्यांना भरपूर मोबदलाही देण्यात आला .भरपूर मोबदल्याशिवाय रखवालदार मिळत नव्हते.

दीपस्तंभाचे काम चालूच होते . एकावर एक मजले चढत होते . चक्री जिनाही तयार होत होता .दीपस्तंभाची उंची भरपूर असल्यामुळे एक लिफ्टही बसवण्यात येत होता .

रखवालदार रात्रीचे झोपलेले असताना कुणीतरी जिन्यातून ये जा करीत आहे  असे आवाज येऊ लागले .गवाक्षातून येणाऱ्या वाऱ्यामुळे असे आवाज निर्माण होतात असे काहीजणांचे म्हणणे होते. रखवालदार धाडसी होते त्यांनी जिन्यातून कोण चढउतार  करते ते पाहण्याचा प्रयत्न केला .प्रत्यक्षात कुणीही आढळले नाही .रखवालदार आपल्या जागेवर आले की कुणीतरी चढउतार करण्याचा आवाज येऊ लागे.रखवालदार पाहू लागले की तिथे कुणी आढळत नसे.

प्रत्यक्षात भुतानी कुणाही मजुराला किंवा रखवालदाराला त्रास दिला नाही .रखवालदार व मजूर उगीचच अफवा पसरवतात असा संशय प्रगट करण्यात आला .आपला पगार वाढवावा म्हणून अश्या अफवा पसरवतात असे काही जण म्हणत होते.खरे काय ते एक भूत किंवा रखवालदार व मजूरच जाणे.

अश्या अडचणीतून अश्या अफवामधून शेवटी दीपस्तंभ पूर्ण झाला.फिरता दिवा बसविण्यात आला. तळमजल्यावर  एक जनरेटर बसवून तिथून सर्वत्र वीज पुरवठा करण्यात आला .

मुख्य जमिनीपासून समुद्रातून एक विजेचे कनेक्शन दीपस्तंभाला देण्यात आले.जनरेटर ही पर्यायी योजना होती.

दिवा काही दिवस व्यवस्थित काम देत होता .नंतर एकाएकी त्याचे स्वतः भोवती फिरणे थांबले.तज्ञाने त्याची पाहणी केल्यावर त्याला कुठेही दोष आढळला नाही .त्याने तसा अहवालही दिला .आणखी काही तज्ञांनीही त्याची तपासणी केली  .काहीही दोष नाही दिवा फिरत का नाही ते सांगता येत नाही असाच सर्वांचा अहवाल होता.

पुन्हा एकदा बेटावरच्या भुताटकीमुळे असे होते अशी चर्चा सुरू झाली.याशिवाय दुसरे कुठलेच स्पष्टीकरण पटण्यासारखे नव्हते .फारतर असा काही तरी दोष आहे की जो तज्ञ शोधू शकत नाहीत असे म्हणावे लागले असते.

दिवा प्रकाशझोत टाकत होता परंतु फिरत नव्हता तोच दिवा एक दिवस काहीही न करता फिरू लागला .याचे स्पष्टीकरण कसे देणार ?कधी दीपस्तंभ व्यवस्थित काम करतो, तर कधी दिवा असतो परंतु तो गोलाकार फिरत नाही,तर कधी गोलाकार फिरतो परंतु दिवा लागत नाही असे होऊ लागले . लिफ्ट अकस्मात बंद पडू लागली .तांत्रिक चूक काहीही आढळत नव्हती 

जहाजांना योग्य मार्गदर्शन होईना.एवढा त्रास घेऊन,खर्च करून , अडचणी सोसून ,दीपस्तंभ उभा करण्याचा हेतूच असफल झाला होता.जहाजांची सुरक्षितता महत्त्वाची होती पूर्वीसारखे एक जहाज तिथे कायमचे उभे करावे असेही काही जण सुचवू लागले .

एक दिवस दीपस्तंभाच्या देखभालीसाठी नेमलेल्या टीमपैकी एकजण  वरच्या मजल्यावरून खाली पडून मेला .भांडण झाल्यामुळे त्याला रागाच्या भरात ढकलून देण्यात आले .या दिशेने पोलिसांनी चौकशी केली .परंतु प्रत्यक्षात कुणीही दोषी आढळला नाही.

दीपस्तंभ बांधणीला सुरुवात करण्याअगोदरपासून, दीपस्तंभ बांधताना व दीपस्तंभ बांधून पूर्ण झाल्यावर तो कार्यरत असताना काही ना काही अडचणी येतच होत्या. 

त्यातील बऱ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण देता येत नव्हते .बेटावर काहीतरी अमानवी आहे ही सुरुवातीपासून असलेली समजूत दृढ होत होती .दीपस्तंभ योग्य पद्धतीने काम करण्यासाठी काय करावे असा प्रश्न होता.

प्रत्येक गोष्टीत तज्ञ असतो त्याप्रमाणे अशा गोष्टींमध्येही कुणीतरी तज्ञ असणारच.अमानवी अस्तित्वाचा त्रास दूर कोण करील या दिशेने  तपासाला सुरुवात झाली .सरकार शास्त्रीय पद्धत सोडून देत आहे. अशास्त्रीय मार्गाने जात आहे.बुवाबाजीला अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे अशी विरोधी पक्षांकडून व अनेक तथाकथित  बुद्धीमंताकडून टीका करण्यात आली . दीपस्तंभाच्या रचनेमध्ये दोष असला पाहिजे .ज्याने दिवा व इतर सर्व रचना उभी केली त्याने पैसे खाल्ले असले पाहिजेत .त्याला शिक्षा करण्याऐवजी रचनेतील दोष शोधून काढण्याऐवजी सरकार चुकीच्या मार्गाने जात आहे असा एकूण टीकेचा रोख होता .

सरकारने आमचा तसा काही हेतू नाही दीपस्तंभाचे काम सुरळीत करण्यासाठी एका प्रमुखाची नेमणूक करण्यात आली आहे तो त्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करील असे प्रसिद्ध करून टाकले आणि आपले अंग त्यातून काढून घेतले.

दीपस्तंभाचे काम सुरळीत करण्याची  ज्याच्याकडे जबाबदारी होती त्याने गाजावाजा न करता अमानवी गोष्टींचा प्रभाव असेल  तर त्यावर काय करता येईल याची चौकशी सुरू केली.

एका स्वामींचा तपास लागला .त्यांना प्रत्यक्ष बेटावर नेऊन परिसर व येणाऱ्या अडचणी सांगण्यात आल्या. त्यांच्या पद्धतीने पाहणी केल्यावर त्यांनी यावर उपाय निश्चित करता येईल असे सांगितले .त्यांच्या एकूण सांगण्याचा आशय पुढीलप्रमाणे होता .

बेटावर अनेक होड्या  जहाजे आपटल्यामुळे तिथे ज्यांचा मृत्यू झाला व जे पुढील गतीला गेले नाहीत अश्यांचा तिथे रहिवास आहे .आपण बेटाचे धनी आहोत असा त्यांचा समज आहे .माणसांचे तिथे येणे दीपस्तंभ उभारणे हे त्यांना त्यांच्या प्रदेशावर केलेले आक्रमण वाटते.त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने विरोध करीत आहेत .

ज्याला सुरुवात आहे त्याला अंतही आहे .काही वर्षांनी किती वर्षे लागतील ते सांगता येत नाही ,बेट भूत मुक्त होईल . दीपस्तंभाचे काम व्यवस्थित चालावे यासाठी एक उपाय योजना आहे .मी एक मंतरलेले पाणी असलेला कमंडलू तुम्हाला देईन .त्याची दीपस्तंभामध्ये कायमची स्थापना केल्यास दीपस्तंभाचे काम व्यवस्थित चालेल.

तुम्ही काय करणार असे विचारता त्यांनी पुढील माहिती सांगितली .

शुद्ध तांब्याचा एक कमंडलू घेणार .त्यामध्ये गंगाजल भरणार .मी स्वतः सूर्योदयाअगोदर स्नान करून सूर्योदयाबरोबर पद्मासन घालून कमंडलू अभिमंत्रित करण्याला सुरुवात करणार .मी माझे अासन सूर्यास्ताबरोबर सोडीन.काहीही न खाता पिता कमंडलू  अभिमंत्रित करण्याचे काम दिवसभर चालू राहील .

त्रिधारी रुद्राक्ष उजव्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन एक विशिष्ट बीजमंत्र जपावा लागतो .मंत्रोच्चारण करीत असताना तो रुद्राक्ष तप्त होत जातो .अशी एक वेळ येते की तो हातात धरणे अशक्य होते .त्यावेळी तो समोर असलेल्या पाणी भरलेल्या कमंडलूत टाकण्यात येतो .

रुद्राक्ष थंड झाल्यावर पुन्हा उजव्या हाताच्या मुठीत धरून पुढील मंत्रोच्चारणाला सुरुवात होते.एकदा रुद्राक्ष तप्त झाल्यामुळे कमंडलूत टाकला की एक खडा बाजूला ठेवण्यात येतो .

असे एक हजार वेळा झाल्यावर ते पाणी मंत्राने भारित होते.कमंडलू शुद्ध तांबे चांदी सोने यापैकी कुठल्याही धातूचा  चालेल.हा कमंडलू वरती पत्रा टाकून सील करण्यात येइल .असा अभिमंत्रित कमंडलू मी तुम्हाला देईन.यासाठी सुमारे शंभर दिवस लागतील .कदाचित जास्त वेळ लागेल . 

दीपस्तंभाच्या भिंतीमध्ये त्या कमंडलूची कायमची स्थापना करा .भिंतीमध्ये तो चिणून टाकला तर फारच उत्तम .

असे केल्यामुळे दीपस्तंभ,बेटावरील भुतांपासून मुक्त होईल. त्याचे काम व्यवस्थित चालेल.

*स्वामीना कमंडलू अभिमंत्रित करण्याची विनंती करण्यात आली.*

*चार महिन्यांनी त्यांनी सील केलेला कमंडलू दीपस्तंभ प्रमुखांच्या हवाली केला .*

*तो कमंडलू सर्वात वरच्या मजल्यावर जिथे फिरता दिवा बसविण्यात आला होता त्यातील एका भिंतीमध्ये कायमचा बंद करण्यात  आला.*

* तेव्हापासून दीपस्तंभाचे काम व्यवस्थित चालले आहे .*

(समाप्त )

१३/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel