(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)    

ती त्याला बोलता करण्यात यशस्वी झाली होती .यापूर्वी तो फक्त त्याच्या संगीतविषयक आवडीबद्दल बोलला होता.तिला इतका आनंद झाला की स्वतःभोवती एक गिरकी मारावी आणि महेशला मिठीत घ्यावे असा मोह तिला झाला .आपल्या डॉक्टरी पेशाला हे शोभणार नाही असे तिच्या मनात आले. आणि ती जिथल्या तिथे थांबली.मला आता गेले पाहिजे पुढील हकिकत उद्या सांगेन असे म्हणून तिने त्याचा निरोप घेतला .

दुसऱ्या दिवशी ती गोष्ट लक्षात ठेवून तो काही विचारणा करतो का ते तिला पाहायचे होते. दुसऱ्या दिवशी त्याने ती आल्यावर पुढे काय झाले म्हणून विचारले.तिने ती हकीकत पूर्ण केली.तिचे रोज येणे,तिचे त्याच्याशी  गप्पा मारणे याची त्याला सवय होत होती .एक दिवस ती मुद्दाम त्याला भेटायला गेली नाही .त्या दिवशी तो अस्वस्थ होता .डॉक्टरसाहिबा अाज कां आल्या नाहीत म्हणून तो सिस्टरजवळ चौकशी करीत होता . 

ही गोष्ट तिला सिस्टरने  सांगितली होती.तिचे न येणे हा त्याला सुरू असलेल्या ट्रिटमेंट्चाच एक भाग होता.ती आल्यावर त्याने तुम्ही काल कां आलात नाहीत म्हणून पृच्छा केली.काल माझी प्रकृती जरा बरी नव्हती असे उत्तर दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर किंचित काळजी पसरलेली त्याला दिसली.

तिने त्याला त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.त्याची उत्तरे त्याला देता येत नव्हती .गोंधळल्यासारखा तो तिच्याकडे पाहात होता .अजून बर्‍याच  ट्रीटमेंटची गरज आहे ही गोष्ट दिशाच्या लक्षात आली. 

तिने एक दिवस काही पुस्तके त्याला आणून दिली.त्यामध्ये  शामची आई हेही पुस्तक होते.त्याने ते पुस्तक केव्हातरी लहानपणी वाचलेले असावे. नेमके तेच पुस्तक त्याने वाचण्यासाठी घेतले .पुस्तक वाचनात तो गढून गेला होता.पुस्तक वाचताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणोक्षणी बदलत होते .जणू काही तो स्वतः शाम होता आणि त्याचे जीवन उपभोगत होता .त्याची ती तन्मयता, त्याची ती भाविभोर मुद्रा पहाण्यात दिशाला आनंद होत होता .त्याच्या प्रगतीबरोबर आपली प्रगती होत आहे असा भास तिला होत होता.त्याच्यावर उपाययोजना करता करता ती त्याच्यात इतकी सामावून गेली होती की तिला आपले वेगळे अस्तित्वच उरलेच नाही कि काय असे वाटत होते.ती चमकली .इथे ती खामोशी सिनेमांप्रमाणे त्याच्यावर प्रेम करण्याचे नाटक करीत नव्हती .प्रेमही करीत नव्हती .ती केवळ एक डॉक्टर होती .तो बरा होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी ती करीत होती.असे असले तरी कुठे तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात नाजूक भावना निर्माण होत आहेत की काय असा संशय तिला येऊ लागला होता.संशय काय तिला खात्रीच वाटू लागली होती . 

महेश हळूहळू बदलत होता.वडील, बहीण, भाऊ, आल्यावर तो त्यांच्याशी त्रोटक का होईना परंतू काही शब्द बोलू लागला होता .केव्हां तरी कुणाबद्दल तरी एखादा प्रश्न विचारीत होता.

रोज कांही मराठी व क़ही इंग्रजी वर्तमानपत्रे त्याच्या खोलीत आणून ठेवली जात असत.आतापर्यंत तो त्यांच्याकडे ढुंकूनही पहात नसे. एक दिवस त्याने वर्तमानपत्र उघडून वाचण्याला सुरुवात केली.

महेश हळूहळू  माणसात येऊ लागला होता.आतापर्यंत त्याने त्याचा मोबाइल मागितला नव्हता.भेटायला आलेले मित्र नातेवाईक फोन वापरत होते परंतु त्याबद्दल त्याने काहीही प्रतिक्रिया दाखविली नव्हती. एक दिवस त्याने त्याचा मोबाइल कुठे आहे म्हणून विचारले .दुसऱ्या  दिवशी  त्याला त्याचा मोबाइल त्याच्या हातात देण्यात आला .एखाद्या सराईतासारखा तो त्याचा मोबाइल वापरू लागला.

दिशाने एक दिवस श्यामची आई हा चित्रपट तिच्या यूएसबी मध्ये डाऊनलोड करून  आणला होता. लॅपटॉपवर तो चित्रपट त्याला दाखवण्यास तिने सुरुवात केली .तोही रस घेऊन तो चित्रपट पाहत होता .दिशा त्याच्याकडे निरखून पाहत होती.चित्रपटातील  भावनोत्कट प्रसंगांबरोबर तोही गहिवरून येत होता. एकदा तर त्याला त्याचे अश्रू आवरत नाहीसे झाले.दिशाला तो मनसोक्त रडायला  हवा होता .त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याचा जो पुतळा झाला तो झाला.त्याचा बांध कुठेतरी फुटणे गरजेचे होते.सिनेमातील करुण भावनोत्कट प्रसंग पाहता पाहता त्याचे भान हरपले.त्याच्या दोन्ही डोळ्यातून मुक्तपणे अश्रू वहात होते .

एक दिवस दिशाने त्याला पुन्हा त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.पूर्वी असा केलेला प्रयत्न फुकट गेला होता.आज त्याने प्रश्नांची उत्तरे देण्याला सुरुवात केली .त्या भयानक अपघाताबरोबर त्यांच्या मेंदूचे अनेक कप्पे बंद झाले होते.दिशाच्या उपाययोजनेमुळे महेशचा एकेक कप्पा उघडत होता.  

दिशाची उपाययोजना सुरू होऊन एक महिना झाला होता .महेशची खूपच प्रगती झाली होती .हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर तिचे कौतुक करीत होते.ती नामांकित सायकॅट्रिस्ट होईल असे भाकीतही त्यांनी वर्तविले होते.

त्याला त्याचा सर्व भूतकाळ आठवू लागला होता .आईला झालेला अपघात व त्यात तिचा झालेला दुर्दैवी मृत्यू तोही त्याला आठवत होता .अजूनही त्या आठवणीमुळे तो अस्वस्थ होत होता.अजूनही त्याला औषधे द्यावी लागत होती .अजूनही औषधांशिवाय त्याला मानसिक स्थैर्य येत नव्हते.

एक दिवस त्याने त्याच्या ऑफिसबद्दल चौकशी केली .दिशाने त्या दिवशी फोन करून मुद्दाम त्याच्या ऑफिसमधील कांही मित्रांना बोलाविले. त्याने त्यांना नावाने ओळखले .ऑफिस बद्दल चौकशी केली. गप्पा मारल्या.

महेशच्या घरचे कुणीही आले तरी ते दिशाला भेटल्याशिवाय  जात नसे.त्यांच्या बोलण्यात अादर, कृतज्ञता,प्रेम, ओसंडून वाहत असे .तुमच्यामुळे माझा सोन्यासारखा मुलगा माझ्या हाती लागला असे त्याच्या वडिलांच्या वारंवार बोलण्यात येई.

मी माझे कर्तव्य केले.मी डॉक्टर आहे. तो माझ्या कामाचाच भाग होता .असे दिशा त्याना वेळोवेळी सांगत असे.  

महेश आता जवळजवळ पूर्ण बरा झाला होता.अजूनही त्याला काही औषधे द्यावी लागत होती .औषधे पूर्ण बंद झाल्यावर,आणि तसेच काही आठवडे गेल्यावर , तो पूर्ण बरा झाला असे सांगता आले असते.

एखादा अपघात एखादा मृत्यू बघून तो पुन्हा बिथरण्याचा संभव होता.

दिशाने आणखी एक प्रयोग केला .इंग्रजी हिंदी व मराठीतील कांही सिनेमा शोधून काढले.ज्यामध्ये हिंसा आहे, ज्यामध्ये अपघाताची विदारक दृष्ये आहेत, ज्यामध्ये भावनोत्कट प्रसंग आहेत,असे ते सिनेमा होते.यूएसबी मध्ये ते सर्व सिनेमा डाऊनलोड करून तिने तो यूएसबी त्याला आणून दिला . सवडीप्रमाणे हे सिनेमा पाहा अशी शिफारस तिने त्याला केली .ते सिनेमा पाहताना तो कितपत भावनाप्रधान होतो, कितपत डिप्रेशनमध्ये जातो,ते तिला पाहायचे होते .तीन चार दिवस तो ते सिनेमा पाहात होता .तो बरा झाल्याची ती जवळजवळ लिटमस टेस्ट होती.

त्यात तो पास झाला .जीवनात प्रत्यक्ष जेव्हा असे काही प्रसंग येतील त्यावेळी तो त्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकला तरच तो पूर्ण बरा झाला असे म्हणता आले असते .अर्थात ती परीक्षा दिशाला घेता येणे शक्य नव्हते .भविष्यातील घटनाच परीक्षा घेणार होत्या.

महेशला डिस्चार्ज मिळाला.तो पूर्ण बरा झाल्याचे सर्टिफिकेट त्याला मिळाले .तो ऑफिसात नेहमीप्रमाणे जाऊ लागला .

एक दिवस दिशाचे वडील तिला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आले.तिला व मोठ्या साहेबांना घरी जेवण्यासाठी बोलावणे करण्याला ते आले होते. त्यांना त्या दोघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा होती. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याना बोलाविले आहे हेही सांगितले .मोठ्या साहेबांनी नम्रतापूर्वक आभार मानून वेळ नसल्यामुळे येता येणार नाही तरी क्षमस्व असे सांगितले .त्याचबरोबर दिशाने हे सर्व काही केले आहे असे सांगून दिशाचे कौतुक केले.दिशा अवश्य येईल असेही तिच्या वतीने सांगितले .तीही संकोच न करता त्यांच्या घरी गेली.भोजनानंतर महेशच्या वडिलांनी तिला एक अल्पशी भेट दिली .तो एक रत्नजडीत हार होता .

महेश व्यवस्थित गप्पा मारीत होता .न्यूनत्वाचे कुठलेही लक्षण त्याच्यात दिसत नव्हते.

एक दिवस महेश तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला .तो तिला डिनरला बोलाविण्यासाठी आला होता.त्याला तिच्याशी मैत्री वाढवण्याची इच्छा दिसत होती .

तीही डिनरला गेली.दोघेही अधूनमधून भेटू लागली.दोघेही दोन चार दिवस एकमेकांना न भेटता राहिली तर त्यांना अस्वस्थ वाटू लागते.

दोघेही व्हॉट्सअॅपवर व फेसबुकवर आहेत.एकमेकांशी गप्पा होत असतात.  दिवसातून एकदा तरी कुणाचा तरी फोन दुसऱ्याला जात असतो .दोघेही यथावकाश लग्न करणार असे नातेवाईक व मित्र समजून आहेत.  

दिशा एमडी करीत आहे .एमडी होईपर्यंत तिला लग्नाचा विचारही करायचा नाही .

महेश तिच्यावर प्रेम करतो त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे याची तिला जाणीव आहे .

*तिला महेश नक्की प्रिय वाटतो .त्याच्याशी मैत्री तिला सुखद वाटते .त्यांच्यामध्ये मैत्रीचे पक्के नाते आहे .*

*परंतु अजून तिच्या डोक्यात घंटी वाजलेली नाही.अजून महेशने तिला मागणी घातली नाही .*

*ती एमडी होईपर्यंत महेश थांबायला तयार आहे .*

*दिशाचे कुटुंबीय व महेशचे  कुटुंबीय एकमेकांकडे येत जात असतात.*

*मैत्रीचे संबंध नात्यात परावर्तीत व्हावेत असे दोघांच्याही कुटुंबियांना वाटते .*

*भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे कुणालाच माहित नाही .*

(समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel