उदयने ती चिठ्ठी खिशात टाकली. फाडली नाही. दुसर्‍याच्या भावना पटल्या नाहीत, त्या स्वीकार्य वाटल्या नाहीत, तरी त्यांची विटंबना करू नये. त्याने ती चिठ्ठी खिशात ठेवली.

बाहेर आता रात्र होती. उदयला झोप येत नव्हती. आई अत्यवस्थ असल्याचे त्याला कळले होते. दोन दिवसांची सोबती ! परंतु भेटेल का तरी? असेल का माझी इतकी पुण्याई?

नाशिक आले. त्याने स्टेशनवर द्राक्षांची करंडी घेतली. आईला होतील. नाशिकमध्ये एके काळी तो राहिलेला होता. त्याचे बाळपण नाशकात गेले. त्याला अनेक गोष्टी आठवल्या. गंगेत बुडून मरण्याची वेळ आठवली. आईच्या वात्सल्याच्या अनेक आठवणी त्याला आल्या. त्या पवित्र प्रेमळ स्मृतींच्या गंगेत तो डुंबत होता.
तो आता जरा पडला. विचार करून करून त्याचे डोके सुन्न झाले होते. त्याला झोप लागली. तो एकदम जळगावला जागा झाला. घाईघाईने तो उतरला. अद्याप पहाट नव्हती   झाली. त्याने एक टांगा केला. तो घरी जायला निघाला.

त्याचे हृदय खालीवर होत होते. आई ! भेटेल का आई ! हेच सारखे मनात येत होते. आले घर. थांबला. त्याने सामान उतरून घेतले. मामा बाहेर आले. त्या लहानशा जागेत बरीच मंडळी होती.

“मामा, आई कशी आहे?”

“गेली हो तुझी आई. थोडा उशीर झाला. दोन तासांपूर्वीच तिने राम म्हटला.”

मामांनी भाच्याला हात धरून आत आणले. सामान आणले. उदय आईच्या मृतदेहाजवळ बसला. त्याने “आई” अशी हाक मारली. कोण ओ देणार? ते प्रेमळ ओठ मुके झाले होते. ती वत्सल दृष्टी बंद झाली होती. आईच्या ओठांवर तुळशीपत्र होते. गळयात तुळशीची माळ होती. पवित्र पावन मूर्ती. त्याने पुन्हा “आई” अशी हाक मारली. त्याने आईच्या वक्ष:स्थलावर डोके ठेवले. त्याचे अश्रू थांबत ना. त्याने उठून आईच्या पायांवर मस्तक ठेवले. ते पवित्र चरण डोळयांतील उष्णोदकाने त्याने प्रक्षाळिले.

तो आईचे पाय धरून बसून राहिला. मधून त्याला हुंदके येत होते.

“उदय, थोडा उशीर झाला. उगा रडू नको. आशीर्वाद देऊन ती देवाघरी गेली. तुझी आई तुझ्याजवळ आहे. प्रेममयी मातेला कोण नेणार? देह गेला. परंतु मातेचे प्रेम चिरंजीव आहे. ते तुझ्या जीवनाला पोशीत राहील. उगी रडू नको. मी आहे तुला. जशी माझी मुले तसा तू.” मामा समजावीत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel