“सरला.”

“चांगले नाही नाव. दुसरे ठेवले पाहिजे. तुमचे नाव हिरी ठेवले तर? का चंपा? का रत्नी? कोणते आवडेल बोला. रात्रभर विचार करा.”

“हा आश्रम ना?”

“होय.”

“काय नाव याचे?”

“सेवा आश्रम. जो येईल त्याची मनापासून सेवा करायची. ताबडतोब फळ. सेवेने तात्काळ स्वर्ग. समजलीस? तू या आश्रमाचे भूषण होशील. मग बघशील मौज. खायला गोड मेवा. रात्री गोड सेवा. संत्री, मोसंबी, पेरू, डाळिंबे, अंजीर, द्राक्षे वाटेल ती फळे. फळे अधिक खाल्ली म्हणजे अंगकांती सुंदर राहते. पोपट फळे खातो. म्हणून कसे त्याचे सुंदर, तजेलदार पंख असतात ! कशी लाल चोच ! येथे तुला फळे देऊ. केशरी दूध. समजलीस ना ! नेसायला शालू. गळयात मोत्यांचे हार. उद्या बघ आता. राजाची राणी होशील. मोठमोठे लक्षाधीश आता येतील. हां हां म्हणता बातमी मुंबईकडे जाईल. भुंगे येतील. गूं गूं करतील. पायाशी धनदौलत ओततील. आश्रमाचे तू भाग्य आहेस. आश्रमाला उतरती कळा लागत होती. मोठमोठे लोक येतनासे झाले होते. त्यांना नाजूकसाजूक हवे काम. त्यांना ओबडधोबड नाही आवडत. आता ते येतील. मिटक्या मारीत येतील.”

“मी कोठे आहे?”

“आश्रमात.”

“अरे देवा, मी कोठे आहे?”

“देवाने सुखाच्या स्वर्गात तुम्हांला आणले आहे. स्वर्गात काय असते? अप्सरा; अमृत; नाच-गान; खरे ना? येथेही अप्सरा व गंधर्व असतात. येथेही अमृत पितात. सुखाला तोटा नाही.

“अरेरे ! मी कोठे आल्ये? फसवले रे मला दुष्टाने !”

“तू दु:खात फसली होतीस. येथे आता सुखात रमून जा. दोन दिवस वाईट वाटते, परंतु मग केवळ आनंद असतो. रोज नवीन आनंद. नवीन भेटी. एकाच्याच भेटीचा वीट येतो. येथे रोज नवीन मौज. तू बघशील आता. तुझे तोंड फुलेल. कानांत हिर्‍याची कुडी घाल. नाकात चमकी घाल. गळयात मोत्यांचे हार घाल. चटकचांदणी हो. समजलीस?”

“हाय रे देवा ! देवा, माझे प्राण ने रे !”


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel