प्रास्ताविक

*********************************************************************

खूप वर्षांपूर्वी जपान मधील समुद्रा जवळच्या एका गावात घडलेली गोष्ट आहे. त्या गावात योहेई नावाचा  गरीब मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. एकदा योहेईला चिखलात माखलेली एक पांढरी मांजर आपल्या दारात दिसली. त्याने त्या बेवारस मांजरीचे स्वागत केले आणि मांजर पसार होण्यापूर्वी  त्याने त्याचे जेवण त्याच्याबरोबर वाटून घेतले. मग ती मांजर त्यांच्याकडेच राहू लागली. पुढे योहेईचे वडील आजारी पडले तेव्हा तो खूप उदास झाला. बापाची काळजी घेण्यासाठी तो घरीच राहिला असता तर हाता तोंडाची गाठ कशी पडणार होती? अशा वेळी त्या लहानशा पांढऱ्या मांजरीला योहेईचे औदार्य आठवले आणि ती प्रत्येक वेळी आपले पंजे हलवत हलवत काही न काही मदत घेऊन परत येत असे.

*********************************************************************

 

खूप खूप वर्षांपूर्वी योहेई नावाचा एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत जपान मधील समुद्रा जवळच्या एका गावात राहत होता. रोज सकाळी सूर्य उगवला की तो उठून मासे खरेदी करण्यासाठी बंदरावर जात असे. मग ते मासे तो घरोघरी नेऊन विकत असे. खांद्यावर एखाद्या कावडी प्रमाणे दोन्ही टोकांना ड्रममध्ये मासे ठेवून तो घरोघरी पायी हिंडत असे. योहेई खूप परिश्रम घेत असे पण तरीही तो गरीब होता.

एकदा त्याचे वडील आजारी पडले, तेव्हा योहेईने औषधे विकत घ्यायला पैसे मिळवण्यासाठी आणखी कठोर परिश्रम केले. पण त्याला खांद्यावर एकावेळी दोनच ड्रम मासे वाहून नेता येत होते. त्याला जास्त मासे विकता आले नाहीत म्हणून वाईट वाटत होते.

एका पावसाळी संध्याकाळी, योहेई घरी भात शिजवत होता, इतक्यात त्याला त्याच्या घराच्या  दारात कसलातरी आवाज आला. त्याने दार उघडले. तेव्हा बाहेर एक मांजर थरथरत असताना त्याला दिसली. तिची पांढरी फर चिखलाने माखली होती. मांजर आत जाण्याची परवानगी मागत असल्यासारखे वाटत होती.

पुढे तीन दिवसांनी योहेई गावात मासे विकत होता. इतक्यात त्यांच्या शेजारचे मामा  त्याच्याकडे धावत आले. "योहेई, लवकर घरी चल, तुझ्या वडिलांना खूप ताप भरला आहे!"

नुकत्याच खरेदी केलेल्या ताज्या माशांनी भरलेले जड ड्रम उचलून योहेई लगेच घराकडे धावला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा मांजर दाराजवळ उभी होती. योहेई त्याच्या वडिलांजवळ  गेला. त्याने वडिलांच्या कपाळावर थंड पाण्याचे ओले कापड ठेवले. काही वेळाने त्याच्या वडिलांना बरे वाटू लागले. ताप जरा कमी झाला होता. योहेईने माशाच्या कावडीकडे पाहिले आणि एक सुस्कारा सोडला.

"आता मी काय करू? मी आज मासे विकायला बाहेर तर जाऊ शकत नाही  आणि उद्यापर्यंत सगळे मासे खराब होतील."

तेवढ्यात दारावर थाप पडली. योहेईने दार उघडले तेव्हा रंगीबेरंगी सिल्क किमोनो घातलेली एक तरुणी त्याच्या समोर उभी होती.

"नमस्कार! मी तुमची काय मदत करू शकतो?" योहेईने आश्चर्याने विचारले.

"तू मच्छिमार आहेस का?" तिने लाकडी ड्रममधील माशांकडे बोट दाखवत विचारले.

"किती विचित्र, एका मांजरीने मच्छीमाराकडे ग्राहक आणला!" मग मुलगी किमोनोच्या बाहीने चेहरा झाकून हलकेच हसली.

"काय म्हणायचंय तुम्हाला?" योहेईने विचारले.

"ती पांढरी मांजर तुझी नाही का? माझा शिवणक्लास सुटला ना तेव्हा तिने माझ्याकडे बघून म्याव म्याव केले. मग काही पावले चालल्यावर मांजर वळली आणि 'माझ्यासोबत चल' म्हणल्यासारखा आपला पंजा ती हलवत होती. मी तिच्या मागे गेले. ती खूप सुंदर दिसते."

योहेई स्तब्ध झाला. त्याने तिला सर्व काही सांगितले की मांजर त्याला पहिल्यांदा भेटायला कशी आली होती.

"किती छान मांजर आहे!" ती मुलगी हसत म्हणाली.

"म्हणजे तिने मला तुमचा मासा विकत घ्यायला इथे आणले असावे!" त्यानंतर मुलीने तीन मासे विकत घेतले. योहेईने वाकून आभार मानले.

काही वेळातच योहेईला त्याच्या दारावर आणखी एकदा ठोठावल्याचा आवाज ऐकू आला. जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा त्याला बाहेर एक म्हातारा माणूस उभा दिसला.त्याचे जवळच्याच गावात एक मोठे दुकान होते.

"नमस्कार साहेब, आज इथे कसे काय येणे केले?" योहेईने विचारले. एका श्रीमंत व्यापाऱ्याला त्याच्या लहानशा घरात आलेला पाहून योहेईला आश्चर्य वाटले.

"तर, ती तुझी मांजर होती!" व्यापारी डोळे विस्फारत म्हणाला. "तुझ्या मांजरीने मला माशांविषयी बोलताना ऐकले असेल."

"माश्याबद्दल?" योहेईने विचारले.

"हो, आज सकाळी, माझ्या सुनेने एका मुलाला जन्म दिला. मला माझ्या नातवाच्या जन्माच्या  पार्टीसाठी दहा चांगले मोठे लाल स्नॅपर्स हवे होते. मी मासे शोधत घराबाहेर पडलो तेव्हा तुझ्या पांढऱ्या मांजरीने माझे लक्ष वेधून घेतले. ती माझ्या जवळ येऊन म्याऊ म्याऊ करू लागली आणि मग तिच्या पंजाने मला इशारा केला. मग मला त्या मांजराचा पाठलाग करावाच लागला आणि इथे तुमच्याकडे ते खास लाल स्नॅपर्स मासे आहेत!"

योहेई खूपच आश्चर्यचकित झाला की त्याने व्यापाऱ्याला त्याच्या वडिलांबद्दल सांगितले आणि नंतर मांजर त्याच्या घरी कशी आली याची संपूर्ण कथा सांगितली.

व्यापारी उद्गारला, "अरे देवा कमालच आहे ! ती तुझ्यासाठी ग्राहक शोधते आहे! मांजरीने अशा दयाळूपणाची परतफेड केल्याचे मी कधीही ऐकले नाही. आजकाल माणसे देखील कृतज्ञता व्यक्त करणे विसरतात."

मग व्यापार्‍याने एक चांदीचे नाणे काढले, जे एक संपूर्ण ड्रम मासे विकत घेण्यासाठी पुरेसे होते आणि योहेईला दिले.

"हे माशांचे पैसे आहेत आणि शिल्लक पैसे तुझ्याकडेच ठेव आणि त्यातून तुझ्या वडिलांची काळजी घे." योहेईने व्यापाऱ्याला नमस्कार केला आणि आभार मानले.

अशाप्रकारे एकापाठोपाठ एक मांजरीने आमंत्रित केलेले लोक योहेईच्या घरी आले. दुपारपर्यंत योहेईचे दोन्ही ड्रम मासे विकले गेले होते. ग्राहकांनी त्याच्या मांजरीची प्रशंसा केली आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याचे आश्वासन दिले. अशाप्रकारे योहेई आपल्या वडिलांची काळजी घेत मासे विकू शकला.

त्या दिवसापासून ती पांढरी मांजर योहेई बरोबर राहू लागली आणि ग्राहकांना बोलावून आणू लागली. मांजराने बोलावल्यावर दूरदूरवरून गिऱ्हाईक योहेईच्या घरी येऊ लागले आणि त्यामुळे योहेई अधिकाधिक मासे विकू शकला. लवकरच त्याने स्वतःचे एक माश्याचे दुकान सुरु केले. हळूहळू औषधांच्या मदतीने योहेईच्या वडिलांची तब्येतही सुधारत गेली.

त्यानंतर इतर सर्व व्यापारीही योहेई प्रमाणेच आपल्याकडेही हुशार मांजर असावी अशी इच्छा करू लागले आणि अशा प्रकारे मांजर जपानमध्ये शुभ संकेताचे प्रतीक बनले. लोकांनी योहेईच्या मांजरीसारखा पंजा वर केलेली पोर्सिलीन मांजर बनवून घ्यायला सुरुवात केली. नवीन ग्राहक यावेत आणि जुन्यांचे स्वागत करावे या आशेने सर्व व्यापार्‍यांनी त्या पोर्सिलेन मांजरी त्यांच्या दुकानात ठेवायला सुरुवात केली.त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जपानला जाल किंवा अमेरिकेतील आशियाई रेस्टॉरंटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला काउंटरवर पोर्सिलीन मांजर दिसली तर ती तिथे का आहे हे तुम्हाला लक्षात येईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel