आपलेच ओठ दादा आपलेच दांत
थोर सारे विसरत मागील रे ॥
तिचे आईबाप नसतात. आईबाप गेले म्हणजे कोठले माहेर असे लोक म्हणतात. ते का खरे होणार ? मरताना मायबाप बोलले ते का दादा विसरेल ?
शेवटील शब्द आई तुला जे बोलली
काय विस्मृती पडली त्यांची दादा ॥
ताईला प्रेम देई तिला रे तूंच आता
माय बोले मरता मरता दादा तुला ॥
या ओव्या वाचता वाचता कोणाचे डोळे भरून येणार नाहीत ? स्त्रियांच्या अंतरंगातील हे थोर दर्शन आहे.
बहिणीला ओवाळणी घालावी लागेल म्हणून तर भावाला चिंता नसेल ना पडली ? अरे, बहीण का पैशासाठी भुकेलेली असते ?
लागेल घालावी फार मोठी ओवाळणी
चिंता काय अशी मनी भाईराया ॥
नको धन नको मुद्रा नको मोतियाचा हार
देई प्रेमाश्रूची धार भाईराया ॥
पानफुल पुरे पुरे अक्षता सुपारी
नको शेला जरतारी भाईराया ॥
भावाला केव्हा पाहीन असे तिला होते. तिच्या डोळयांतून पाणी येते. तिला चैन पडत नाही.
येरे येरे भाऊ किती झाले दडपण
कधी हृदय उघडीन तुझ्यापुढें ॥
येरे येरे भाऊ किती पहावी रे वाट
पाण्याचा चाले पाट डोळयांतून ॥
जिवाच्या जीवना अमृताच्या सिंधु
देई गा तूं बंधू उठाउठी ॥
जिवाच्या जिवलगा प्रेमाच्या सागरा
सुखाच्या माहेरा येई गा तूं ॥