कशाला जगासमोर प्रेम मांडायचे ? ते मनातच आपण ठेवू. मुकेपणाने मनातले बोलू. डाळिंबाचे फळ फोडले तर आत हजारो दाणे भरलेले असतात. वरून किती सुकलेले दिसते. तसे आपले प्रेम वरून बोलण्या-चालण्यात दिसणार नाही. परंतु हृदयात आपण एकमेकांशी गोड बोलू.

जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत बहिणीला आधार वाटतो. दिवाळी आली की चोळीबांगडी तो पाठवतो. श्रीमंत असेल तर चोळीला मोती लावून पाठवतो :

चोळी शिव रे शिंप्या        मोती लाव शिवणीला
चोळी जाते बहिणीला            दूरदेशा ॥

“अशी सुंदर चोळी यावी. परंतु कुंकवाची पुडी दिसत नाही. सासरची माणसे बोलू लागतात. 'काय बाई रीत तरी-” परंतु कावरीबावरी झालेली बहीण म्हणते :

“चोळीयेची घडी             कुंकवावीण धाडी
असें नाहीं पडली पुडी            कोठें तरी ॥”

पुडी पडली असेल. भावाची ती बाजू घेते. श्रीमंत भाऊ मोती लावून चोळी पाठवतो. गरीब भावाने काय करावे ? गरीब भाऊ खण कोठून घेणार ? परंतु गरीब भाऊ डोक्याचा रूमाल फाडतो. त्याची चोळी करून धाडतो. बहिणीचे हृदय भरून येते. ती म्हणते :

भाऊ चोळी शिवी               शिवी आपल्या रूमालाची
धन्य तुझ्या इमानाची                  भाईराया ॥

अशा भावासाठी बहीण काय करणार नाही ?

माझें की आयुष्य            कमी करून मारुती
घाल शंभर पुरतीं                 भाईरायाला ॥
माझ्या आयुष्याचा         भाईराया तुला शेला
उरल्याची चोळी तुला            वयनीबाई ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel