असो. ह्या ओव्या वाचा व धन्य व्हा. नाशिक जेलमध्ये असताना बहीण-भावंडांच्या प्रेमाच्या या ओव्या मी म्हणून दाखवीत होतो. आणि प.खानदेशातील सुप्रसिध्द, कळकळीचे तरुण कार्यकर्ते माझे मित्र श्री. नवल भाऊ पाटील यांचे डोळे भरून आले होते. ते मला म्हणाले, ‘गुरुजी, माझ्या डोळयांतून क्वचितच पाणी येते. परंतु आज माझ्या डोळयांतून तुम्ही पाणी आणले. माझा रडू न येण्याचा अहंकार आज दूर झाला.’ मी म्हटले, ‘ही शक्ती माझी नव्हे. स्वत:चे अनुभव ज्या स्त्रियांनी सहृदय भाषेत उत्कटपणे ओतून ठेवले, त्या स्त्रियांच्या अनुभवपूर्ण, अपूर्ण व जिवंत अशा ह्या ओव्यातील ती शक्ती आहे.’

ओव्या

दसर्‍यापासून                दिवाळी विसां दिशीं
मज माघारा कधीं नेशी            भाईराया            १

माझ्या दारावरनं            रंगीत गाडया गेल्या
भावांनीं बहिणी नेल्या            दिवाळीला           २

भाऊबीजेच्या रे दिवशीं        लोकांचे भाऊ येती
वाट तुझी पाहुं किती            भाऊराया              ३

मुलें पुसतातीं               केव्हां मामा ग येईल
काय उत्तर देईल                बहीण तुझी            ४

मुले पुसताती              येईना का ग मामा
गुंतला काही कामा            माय बोले               ५

कोणत्या कामांत            भाईराया गुंतलासी
बहिणीची कासाविशी            होत आहे             ६

शेजी मला पुसे            येऊन घडीघडी            
कधीं माहेराची गाडी            येणारसे               ७

पूर ओसरले              नदीनाले शांत झाले
अजुन कां न भाई आले            बहिणीसाठी       ८

नवरात्र गेलें               दसरा दूर गेला
नेण्याला का न आला            भाईराया             ९

असेल आजारी            काय माझा भाऊ
आयुष्या त्याला देऊ            देवराया              १०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel