सोड सारा राग रागाचें होवो हंसूं
डोळयांचे माझे असू दादा पुस २६
ताईच्या बाळांचे येऊन घेई मुके
खेळव कौतुकें भाचेयांना २७
येरे येरे मामा बाळें बोलती अंगणी
डोळयांना माझ्या पाणी येते बघ २८
येईल आतां मामा आणील आम्हां खाऊ
मुलें सांगती मुलांना रडें येतें मला भाऊ २९
येरे येरे मामा मुलें बोलती नाचत
प्रेमे भरे माझे चित्त कोणा सांगूं ३०
मागें त्यांनीं तुला रागें कागद लिहिला
त्याचा काय राग आला भाईराया ३१
न्यावया आलास नाहीं पाठविली त्यांनीं
अढी काय त्याची मनीं धरिलीस ३२
आपलेच ओंठ दादा आपलेच दांत
थोर सारें विसरत मागील रे ३३
नको कांही मनीं ठेवूं भाऊ येई लगबग
मायबापांची ती बघ आण तुला ३४
मायबाप मेल्यावरी मग कोठले माहेर
काय खरे हे होणार शब्द दादा ३५
शेवटील शब्द आई तुला जे बोलली
काय विस्मृती पडली त्यांची दादा ३६
ताईला प्रेम देई तिला रे तूंच आतां
माय बोले मरतां मरतां दादा तुला ३७
ताईला प्रेम देई तुला ती तिला तूंच
नको कधीं विसंबूस माय बोले ३८
नको ताईला विसरूं बाबा बोलले आठव
मला गाडी तूं पाठव भाऊबीजे ३९
कोणापुढे रडूं कोणापाशीं बोलूं
कधीं येईल मायाळू भाईराया ४०