दुपारचे ऊन लागते शेल्यांतून
घोडी काढी बागेंतून भाईराया ६१
सूर्यनारायणा तापूं नको फार
येतसे सुकुमार भाईराया ६२
तांबडें पागोटे उन्हाने भडक्या मारी
सुरूच्या झाडाखाली भाईराया ६३
तांबडे पागोटे सोडीतो बांधीतो
चाल पुण्याची काढीतो भाईराया ६४
कावळा का का करी दहीभात मागे
पाहुणा येतो सांगे भाईराया ६५
कावळा कोकावे घराच्या आढयावरी
पाहुणा येतो घरीं भाईराया ६६
दिवस मावळला केळीचे कोक्यांत
मला माघारा सोप्यांत भाईराया ६७
दिवस मावळला कण्हेरी आड गेला
मला माघारा काल आला भाईराया ६८
आई आली आली मामाची गाडी आली
मुलांची हांक आली अंगणांत ६९
मामाची गाडी आली बहीण आनंदली
आनंदें वोसंडली चित्तवृत्ती ७०
भावाला पाहून बहीण गहींवरे
डोळीयांचे झरे वाहताती ७१
पुर ओसरतो बहिणीच्या डोळियांचा
बोलते गोड वाचा बहीण भावा ७२
तुला आळवीत बैसल्ये होत्ये दादा
काय वयनींच्या नादा गुंतलास ७३
तुला आठवीत बैसले दादा देख
काय ऐकलीस हांक भाईराया ७४
आहेस खुशाल खुशाल वैनीबाई
सांग सांग सारें भाई भुकेलेली ७५
काय होतास आजारी डोळे तुझे गेले खोल
बोल रे सख्या बोल भाईराया ७६
किती दिवसांनी भेटशी तूं रे मला
अमृताचा रस भाऊराया चाखवीला ७७
प्रकृतीची दादा नको करूं हेळसांड
बहिणीशीं बोल मनींचे दु:ख सांड ७८
प्रवासाचा शीण नाहीं ताई मी आजारी
हळुवार चित्त भारी ताई तुझे ७९
ताईला पाहून पळाला सारा शीण
भावाला बहीण अमृताची ८०