जीवाला देत्यें जीव जीव देईन आपुला
चाफा कशानें सुकला भाईराया १४१
पिकला अननस हिरवी त्याची छाया
बहिणीवर करी माया भाईराया १४२
पाऊस पाण्याचें कुणी येईना जाईना
माझा निरोप जाईना भाईराजाला १४३
ओळी ओळी घर मोजीत मी गेल्यें
एक घर विसरल्यें भाईरायाचें १४४
दूरदेशीं पेण कोणी येईना जाईना
माझा निरोप सांगेना भाईरायाला १४५
दूरदेशीं पेण महिन्याची वाट
कागदीं तुझीं भेट भाईराया १४६
चोळी माझी ग फाटली चिंता नाहीं ग वाटली
दुसरी पाठवीली भाईरायांनीं १४७
चोळी माझी ग फाटली फाटली फाट जाऊं
घेणाराचें मन पाहूं भाईरायाचें १४८
चोळीयेची घडी कुंकवावीण धाडी
असें नाहीं पडली १ पुडी कुठें तरी १४९
चोळीयेची घडी कुंकवाची पुडी
निरोपावीण धाडी भाईराया १५०
शब्दांचे निरोप बोलले संपताती
मुके निरोप धाडिती भाईराय १५१
चोळीयेची घडी कुंकवाची पुडी
त्यांतून भाऊ धाडी अंतरंग १५२
चोळीयेची घडी कुंकवाचा मासा
चोळी जाते दूरदेशा बहिणीला १५३
चोळी शिव रे शिंप्या चोळी शिव पाटावरी
चोळी जाते घाटावरी बहिणीला १५४
चोळी शिव रे शिंप्या मोती लाव शिवणीला
चोळी जाते बहिणीला दूरदेशा १५५
एकापुढें एक माझ्या माउलीबाईचे
भाऊ चालती सोयीचे चौघेजण १५६
एकापुढें एक चालती शिवूमिवु
नको पापिणी दृष्ट लावूं भाईरायांना १५७
माझ्या अंगणांत चिमण्या पाणी पीती
बहिणी तोंडे धुती भाऊरायाच्या १५८
सरलें दळण उरले पांच गहूं
आम्ही बहिणी ओंव्या गाऊं भावंडांना १५९
टीप - १. भावाकडची चोळी आली, परंतु आत कुंकवाची पुडी नाही हे पाहून सासरची माणसे संतापतात. परंतु भावाची बाजू घेऊन बहीण म्हणते, “असे नाही हो तो करायचा. बहिणीच्या कुंकवाची का त्याला काळजी नाही ? पडली असेल पुडी वाटेत.”