माझ्या दारावरून गाडया ग धांवती
वर रुमाल उडती भाईरायांचे १६०
दादाराया अप्पाराया तुम्ही बसा एकीकडे
दिवाळीचे वांकी तोडे मला द्यावे १६१
दादाराया अप्पाराया तुम्ही बसा एके ओळी
दिवाळीची साडी चोळी मला द्यावी १६२
दिवाळीचा सण भाऊबीज आनंदाची
करूं सख्या गोविंदाची भाईरायाची १६३
बीजेच्या दिवशीं माझ्या ताटामध्यें मोती
ओवाळीन तुझा पति वयनीबाई १६४
शेजी ती पुसती तुला भाऊ ग कितीक
पृथ्वीचा चंद्र एक भाईराया १६५
शेजी ग पुसता तुला भाऊ कोण कोण
चंद्रसूर्य दोघेजण भाईराज १६६
पड रे पावसा पिकूं दे दाणापाणी
भाईरायाला बहीणी आठवीती १६७
पाऊस कीं पडे मृगाआधीं रोहिणीचा
भावाआधीं बहिणीचा संवसार १६८
माझ्या दारावरनं गेला माझ्या घरीं नाहीं आला
काय अपमान झाला भाईरायाचा १६९
हांका मीं मारित्यें उभी राहून गल्लीला
मशीं अबोला धरीला भाईरायाने १७०
माझे दारावरून कोण गेला पगडीचा
कळा माझ्या बुगडीचा भाईराया १७१
तांबडे पागोटयाचा पदर लोंबे पाठीवरी
कंठी शोभे छातीवरी भाईरायाचे १७२
सासुरवाडीं गेला सासू पाहे तोंडाकडे
तुझ्या विडयाला रंग चढे भाईराया १७३
माझ्या दारावरनं मुलांचा मेळा गेला
त्यांत मी ओळखीला भाईराजा १७४
माझ्या दारावरनं हळदीकुंकवाचा नंदी गेला
खडा मारून उभा केला भाईरायांनी १७५
दसर्याचा खण दिवाळीचा रास्ता
ओवाळीन तुझ्या कंथा वयनीबाई १७६
मानीयला भाऊ जातीचा मुसलमान
दिवाळीची चोळी त्याचा कागदी सलाम १७७
मानीयला भाऊ जातीचा मुसलमान
दिवाळीची चोळी घरी आलासे घेऊन १७८
मानीयला भाऊ जातीचा मुसलमान
हस्तीदंती चुडे मला आलासे घेऊन १७९
मानीयला भाऊ जातीचा मुसलमान
सख्ख्या भावा ग परीस त्याचे आहे ग इमान १८०