भावजयांमध्ये वयनीबाई रंभा
सोन्याचा तुळंबा भाईराया २२१
नाकींची ग नथ खाली बस ग पाहूं दे
वज्रटीक ग लावूं दे वयनीबाई २२२
भाऊ माझे गोरे आम्ही बहिणी सांवळया
मखमली त्या पीवळया भावजया २२३
भावजयांमध्ये वयनीबाई शांत
भाऊ माझे सूर्यकान्त उगवले २२४
चैत्रमासींच्या रांगोळया प्रकारच्या
नणंदा झणकाराच्या वन्संबाई २२५
नणंदा वन्संबाई आपुला मान घ्यावा
आशीर्वाद मला द्यावा चुडेयांचा २२६
भावा ग परीस भावजय फार भली
कोणा अशीलाची केली वयनीबाई २२७
भावा ग परीस भावजय ग रतन
सोन्याच्या कारणें चिंधी करावी जतन २२८
वळवाचा पाऊस पडून ओसरला
भावाला झाल्या लेकी मग बहीण विसरला २२९
आम्ही चारी बहिणी चार डोंगराच्या आड
माझ्या भाईराया खुशालीचे पत्र धाड २३०
आम्ही चौघी बहिणी चारी गांवींच्या चिमण्या
सख्या भाईराया आम्ही घटकेच्या पाहुण्या २३१
आम्ही तिघी बहिणी आम्ही आपल्या आईच्या
कळया फुलती जाईच्या बागेमध्यें २३२
चांदात चांदणी मृगात रोहिणी
तशा तुझ्या रे बहिणी भाईराया २३३
आहेवा मरण सोमवारी आलें
भाऊ म्हणती सोनें झालें बहिणीचें २३४
आहेवा मरणाचा आहे मला वांटा
चोळी पातळ कर साठा भाईराया २३५
जीव जरी गेला कुडी ठेवावी झांकून
येईल सर्वही टाकून भाईराया २३६
जीव माझा गेला जर काळोख्या रे रात्री
सख्या लाव चंद्रज्योती भाईराया २३७
संसारीं असतीं उदंड नातींगोतीं
निराळी पडती बहीणभाऊ २३८
संसारी कितीक असतीं नातींगोतीं
मोलाची माणिकमोतीं बहीणभाऊ २३९
जन्मून जन्मून संसारात यावें
प्रेम तें चाखावें बहीणभावांचे २४०
बहीण भावंडांचें प्रेम निर्मळ अनुपम
अमृताहुन उत्तम संसारांत २४१
भावा ग बहिणीच्या प्रेमाला नाहीं सरी
गंगेच्या पाण्यापरी पवित्रता २४२
भावा ग बहिणीच्या प्रेमाला नाहीं तोड
लाभेल ज्याला जोड धन्य धन्य २४३
भावा ग बहिणीचें किती गोड असे नातें
कळे एका हृदयातें ज्याच्या त्याच्या २४४
बहीणभावांच्या प्रेमाला नाहीं सीमा
द्यावी कोणती उपमा जगत्रयीं २४५
बहीणभावांचें प्रेम तें शुध्दबुध्द
अपुरे होती शब्द वर्णनाला २४६