मायलेकरे : ओव्या
माझे तान्हेबाळ देवाचे मंगल
अमृताचे फळ संसाराचे १
देवाजीचे देणे कोणते सुंदर
तान्हेबाळ मांडीवर माउलीचे २
तान्हीया रे बाळा मंगलाच्या मूर्ती
संसाराची पूर्ती तुझ्यामुळे ३
तान्हें हे जन्मले भाग्य ग उदेले
आनंदी बुडाले सारे जग ४
पाळणा बांधीला रंगीत सुंदर
तान्हा सुकुमार माउलीचा ५
पालख पाळणा मोत्यांनी विणीला
मामाने धाडीला तान्हेबाळा ६
रंगीत पाळणा त्याला रेशमाची दोरी
हालवीते गोरी उषाताई ७
पाळण्याच्या वरी विचित्र आकडा
गळां ताईत वांकडा तान्हेयाच्या ८
पाळण्याच्या वरी खेळणे कागदाचे
गोड बोलणे बाळाचें राजसाचें ९
पाळण्याच्या वरी विचित्र पांखरूं
नक्षत्र लेंकरू तान्हेबाळा १०
पाळणा पालखा वर खेळणे मोराचे
बाळ झोपले थोराचे गोपूबाळ ११
पाळणा पात्यांचा वर चेंडू ग मोत्यांचा
आंत बाळ नवसाचा झोप घेई १२
पाळणा बांधीला हत्तीणी दातांचा
आंत बाळ नवसाचा निद्रा करी १३
पाळणा पालखा वर रावे रत्नागिरी
खेळ तुझे नानापरी तान्हेबाळा १४
पाळण्या ग वरी राव्यांचा गलबला
आनंदाची झोंप तुला तान्हेबाळा १५
रंगीत पाळणा त्याला रेशमाचा दोरा
हळुहळु झोंका काढ उषाताई १६
रंगीत पाळणा येताजातांना हलवा
कोठे गेली ती बोलवा उषाताई १७
पाळणा पालव हलवीतो मामा
नीज तू परशरामा पाळण्यांत १८
पोपट पिंजर्यात म्हणूं लागे रामराम
बाळ घेईल आराम पाळण्यांत १९
निजूं दे ग बाई बाळाला क्षणभर
घरांतील कामधंदा आटपूं दे भराभर २०