पाळणा पालख येताजातांना हलवा
माझ्या राघूला नीजवा तान्हेबाळा २१
न्हाउनी माखुनी पालखी घातले
शताउक्ष म्हणीतलें तान्हेंबाळा २२
पाळण्याच्या दोर्या वाजती कराकरा
झोंप नाही चारी प्रहरा गोपू बाळा २३
पाळण्याचे दोर जसे मोतियांचे सर
शोभिवंत घर पाळण्याने २४
रंगीत पाळणा बांधीला बहाली
येतांजातां मुली हालवीती २५
आंथरुण केले पांघरुण शेला
निजवीते तुला गोपूबाळा २६
आंथरुण केले बाई मोगर्यांचे
बाळा गोजिर्यांचें अंग मऊ २७
अंथरुण केले मऊ उबदार
झोंप घे चारी प्रहर तान्हेबाळा २८
निद्रा आली बाळा आपुले पालखी
श्रीरामाला जानकी माळ घाली २९
निद्रा आली बाळा आपुले पालखी
आता काम करू सखी जरा वेळ ३०
बाळासाठी केली चिमणीशी गादी
बाळाचे सारें आधी कवतूक ३१
निजेला रे आले बाळा तुझे डोळे
भोरे विसांवले पाळण्याचे ३२
नीज रे बाळका आपुल्या पालखी
तुला रक्षण जानकी रघुनाथ ३३
अंगाई म्हणून बाळाला निजवी
वाटींत निववी दूधतूप ३४
सकाळच्या वेळी किती असे कामधंदा
नको रडू रे गोविंदा तान्हेबाळा ३५
सकाळच्या वेळी झाडलोट कामधंदा
नको घेऊ वेडया छंदा तान्हेबाळा ३६
सोड रे राजसा सारवूं दे वैलचूल
देईन तुला फूल मोगर्याचे ३७
सोड रे राजसा असा चिकटून नको बसूं
होईल माझे हसूं रामप्रहरी ३८
सोड रे राजसा नको रडूं उजाडत
येतील ओरडत सासूबाई ३९
देव वर आला पडली किती उन्हें
उठले माझें तान्हें झोप झाली ४०