पांखरे उडती फुलवात फुले
उठवतात मुले उजाडत ४१
सूर्य उगवला कमळें फुलली
तान्हेबाळी उघडीली निज दृष्टी ४२
भानु उगवला उगवला लाल गोळा
तान्हेबाळा जागा झाला पाळण्यांत ४३
झोंप रे अजून कशाला उठशी
कोणी म्हणेल आळशी म्हणून कां ४४
झोंप रे अजून करून गुरंगुटी
असें म्हणून थोपटी तान्हेबाळा ४५
मला वाटे बाळ आहे पालखी निजलें
जाऊन बघतें तोच खुदकन् हांसले ४६
उघडून डोळे पाय घालून तोंडात
होतें तान्हुलें खेळत पाळण्यांत ४७
पहाटेची वेळ दूर कोंबडा आरवे
तान्हुल्या झोपी जावे लहान तूं ४८
पहाटेची वेळ कूऊ करिता रहाट
बाळा तूं पाळण्यांत झोंप घेई ४९
पहाटेची वेळ कावळा का का करी
निजावे तान्ह्या परीं पाळण्यांत ५०
पहाटेची वेळ तुला नाही परी काम
नीज रे आत्माराम तान्हेबाळा ५१
पहाटेची वेळ नीज रे बाळपणीं
ऊठ तूं मोठेपणीं तान्हेबाळा ५२
तान्हीया रे बाळा तुला मशीचा रे टिळा
कोणा पापिणी चांडाळा दृष्ट केली ५३
तान्ह्या रे तान्हिका बाळा रे माणिका
तुझ्या रे श्रीमुखा लिंबलोण ५४
घडीघडी कोण उतरी लिंबलोण
तान्ह्या बाळाची बहीण उषाताई ५५
लिंबलोण करूं दोन्ही या ग मुठी भरूं
बाळा बरोबरी शेजीचा बाळ उभा करूं ५६
लिंब ग लोण्याची आयती कोणी केली
तुझी रे मावशी आली तान्हेबाळा ५७
तान्हेबाळ खेळे ओसरीच्या काठीं
जिउतीच्या हातीं लिंबलोण ५८
कोणें दृष्ट केली तान्हेबाळा सोनटक्क्या
बिंदुल्या मनगट्या सैल झाल्या ५९
कोणें दृष्ट केली तान्हेबाळाला देखून
लिंबू देत्ये मी फेकून दृष्टीवरी ६०