पिवळे ग लिंबू पिवळी शेवंती
अंगाची शोभे कांती तान्हेबाळाच्या १०१
पिवळे ग लिंबू पिवळे वरण
किती गोड ग वदन तान्हेबाळाचे १०२
अंगणात उभा कमळाचा जसा देठ
तसा तुझा अंगलोट तान्हेबाळा १०३
अंगणात उभा कसा म्हणूं मी लोकांचा
वांकडा ताईत गोपाचा तान्हेबाळाचा १०४
मोठमोठे डोळे भिवया लांबरुंद
कपाळी शोभे गंध केशराचे १०५
मोठेमोठे डोळे भिंवया चंद्रज्योती
शहाणा म्हणू किती तान्हेबाळ १०६
तान्हेया रे बाळा तुला काय साजे
गळयांत बांधिजे वाघनख १०७
वाघांचे वाघनख सोन्याने मढवीले
गळां चढवीले तान्हेबाळाच्या १०८
गळयांत हांसोळी कमरेत सांखळी
मूर्ति साजिरी गोजिरी तान्हेबाळाची १०९
केलासे ताईत गळयांत घालावा
घालुनीयां न्यावा तान्हेबाळा ११०
सोनारा रे शेटी उघड आपुली पेटी
कडीतोडे कंठी करूं बाळा १११
सोनारा रे शेटी उघड अपुली पेटी
रुसला कंठीसाठी तान्हेबाळ ११२
आले आले पटवेकरी पटवाया काय देऊं
टोपीला गोंडे लावूं तान्हेबाळाच्या ११३
घातलीसे कुंची गझनीच्या कापडाची
मोत्यांच्या पिंपळपानाची त्यांत शोभा ११४
घातलीसे कुंची रेशमी जरतारी
त्यांतुन येताती बाहेरी कुरळे केस ११५
पिंपळपानाची मोती झाली जुनीं
तुला शोभती बाळपणीं तान्हेबाळा ११६
माझिया घरांत मुले लहान लहान
टोपीला पिंपळपान शोभा देई ११७
माझिया घरांत लहान लहान मुले
टोपीला लावू फुले गुलाबाची ११८
माझ्या अंगणात शिंपिणी जावा जावा
टोपीला गोंडे लावा तान्हेबाळाच्या ११९
मला हौस मोठी करगोटा सव्वाशाचा
पुत्र आहे नवसाचा तान्हेबाळ १२०