बापाचा लाडका चुलत्याचा आत्माराम
तुला जडित पिंपळपान तान्हेबाळ १२१
हाती कडीतोडें कमरे करगोटा पेटयांचा
मुलगा दिसतो मोठयांचा गोपूबाळ १२२
हाती कडीतोडे कानांत भीकबाळी
आतां माझ्या तान्हेबाळा नको खेळूं सायंकाळी १२३
हाती कडीतोडे कमरे करगोटा मोराचा
पुत्र दिसतो थोराचा गोपूबाळ १२४
हाती कडीतोडे गळयांत कंठीगौप
सावकाराचा ग लेक गोपूबाळ १२५
हाती कडीतोडे गावठणी उभा
आजीबाई नातू तुझा गोपूबाळ १२६
तान्हीया रे बाळा तुझ्या पायीं वाळा
तुझा डोळा काळा काजळाने १२७
बिंदुल्यांचा हात ठेवी ताटापुढे
जेवती मामापुढें गोपूबाळ १२८
श्रीमंतीचा डौल तुझा बाई पुरे कर
सोनेरी चंद्रकोर तान्हेबाळ १२९
नटव थटव तुझे श्रीमंत लेकरू
मोहक वासरूं बाळ माझे १३०
माझे तान्हेबाळ मला ते आवडे
लोकांना नावडे घडीभरी १३१
माझ्या ग बाळाला नको हो दागीना
कोवळया लावण्या पूर आला १३२
माझ्या राजसाला नकोत दागीने
शोभे अलंकारावीणें तान्हेबाळ १३३
कशाने नटवूं कशाने भूषवूं
कशाने शोभवूं तान्हेबाळ १३४
गरीब माउली काय बाळा लेववील
प्रेमाने पांघुरवील तान्हेबाळ १३५
गरीब माउली काय बाळाला घालील
प्रेमाने रंगवील सर्वकाळ १३६
गरीब माउली कोठले बाळलेणें
बाळाला वात्सल्याने वाढवील १३७
आसवांची माळा गळां घालील बाळाचे
गरीब माउलीचे हेंची धन १३८
श्रीमंतांची मुले शेजारी शृंगारली
नाही ती शोभली बाळापरी १३९
श्रीमंतांची मुले पडलीं निस्तेज
पाहुनीया तेज तान्हेबाळाचे १४०