बाहेर तूं जाई लपंडाव खेळ खेळे
कुसकरती माझे डोळे माउलीये ३२१
बाहेर तूं जाई जरा खेळ छप्पापाणी
डोळयांना आणी पाणी तान्हेबाळ ३२२
बाहेर तूं जाई खेळ हमामा हुतूतू
आई खेळू मी तूं घरामध्ये ३२३
बाहेर तूं जाई खेळ हुतूतू हमामा
तुझ्या करितो सांगे कामा माउलीये ३२४
बाहेर जाई रे खेळ रे लंगडी
दुखते तंगडी माउलीये ३२५
घराचा घरकोंबडा होऊं नये बाळा
बाहेर खेळ जा मुलांमध्ये ३२६
चुलीचा चुलकोंबडा कोणाला आवडेल
नावें तुला ठेवतील तान्हेबाळा ३२७
ऊठ नको बसूं खेळ जा बाहेर
आई तुझ्याबरोबर खेळेन मी ३२८
काम ग करून पाट घेईन बसायाला
माझे तान्हें बाळ मांडीवरी विसाव्याला ३२९
रांगत खेळत बाळ आले विसाव्याला
माझ्या ग राजसाला मांडी देत्यें बसायला ३३०
खेळूनी ग आला धुळीनें माखला
माझा सोनुला दमला तान्हेंबाळा ३३१
मातीने मढलें मांडीये चढलें
मायेने मानीलें मोक्षसुख ३३२
लोळलें मातीत घुसलें मांडीत
मायेच्या मनांत प्रेम दाटे ३३३
माती का लागली माती ना तो रे बुका
चुंबीन तुझ्या मुखा तान्हेबाळ ३३४
माती का लागली लागू दे शोभे तुला
कलंक चंद्राला तान्हेबाळा ३३५
माती का लागली तिची झाली रे कस्तुरी
सोन्याच्या शरीरी तान्हेबाळाच्या ३३६
माती का लागली लागूं दे रे बाप्पा
घेतील प्रेमे पापा बाप्पाराया ३३७
लोकांची ती मुले जसे भिंतीचे दगड
माझी सोन्याची लगड तान्हेबाळा ३३८
शाळेसी जातांना रडे कशाचे रे आले
पाटी दप्तराचे झाले ओझे आई ३३९
शाळेसी जातांना कां रे राया रडूं आले
भय माउली वाटले पंतोजीचे ३४०