शाळेचा पंतोजी काय शिकवीतो
सोडीतो बांधीतो चंचीलागी ३६१
शाळेचा पंतोजी मुलांचा हाकारी
गायींना गोवारी जसा रानीं ३६२
शाळेचा पंतोजी शाळा बाळाला आवडो
घरी ना तो दडो तुमच्या धाकें ३६३
पंतोजी रे बाप्पा नसावा भारी धाक
ओंगणावीण चाक मोडतसे ३६४
शाळेचा पंतोजी मुलां वाटे यम
केलासे कायम कोंडवाडा ३६५
जा रे बाळा शाळे घरी नको कटकट
पुरी तुझी वटवट सांगते मी ३६६
आई नको शाळा मला घरीच शीकव
मुळीं ना पाठव शाळेमाजी ३६७
अडाणी माऊली कसा शिकवील तान्हा
पाठवीते रानावना तान्हेबाळ ३६८
अडाणी माऊली कसा देईल ती धडा
रिकामा काय घडा उपयोगी ३६९
पंतोजी मारती हाताला येतो फोड
आई तूं किती गोड ममताळू ३७०
हट्ट नको घेऊ बाळा शाळेला तूं जाई
विद्येला मिळवी तेचीं धन ३७१
हट्ट नको घेऊ लिहाया घेई पाटी
खिरीची तुला वाटी तान्हेबाळा ३७२
हट्ट नको घेऊं अक्षरे शीक चार
विद्येला मान फार सभेमध्ये ३७३
हट्ट नको घेऊं बाबा मारतील काठी
माय रडेल तुझ्यासाठी तान्हेबाळा ३७४
हाती कडीतोडे कमरेला हिरवा शेला
सखा पंडित शाळे गेला गोपूबाळ ३७५
नागिणी सर्पिणी वाट दे मधुनी
सखा येतो शाळेतुनी गोपूबाळ ३७६
आई तूं खाऊ देशी बाबा का मारताती
बाळा तुझ्या बर्यासाठी माय बोले ३७७
आई तूं मुके घेशी बाबा का बोलताती
पुत्र होवो वाचस्पती म्हणुनीयां ३७८
आई तूं मायेची बाबा कां कठोर
लेकाने व्हावे थोर म्हणुनीयां ३७९
काय रे झालें बाळा कोणी मारीलें
बाप्पाजी गुरगुरले अंगावर ३८०