बाप्पाजी भास्कर माऊली चंद्रमा
बाळाला वाटे प्रेमा माऊलीचा ३८१
बाप्पाजी नारळ माऊली द्राक्षघोस
बाळाला वाटे ओस आईवीण ३८२
बाप्पाजी चंदन घांसलीया वास
आईचा सुवास आपोआप ३८३
माता जरी मारी तान्हेयाला कोण
जाईल सुकून तान्हेबाळ ३८४
कोमल रोपाला काय नको पाणी
नको का जननी तान्हेबाळा ३८५
माता जरी मारी बाळाने कोठे जावे
दु:ख कोणाला सांगावे तान्हेयाने ३८६
माता घरी लोटी बाळ निराधार
स्नेहसूत्रावीण हार कोण गुंफी ३८७
माता घरी दूर तरी कोणी घेई बाळ
त्याची होईल आबाळ घरीदारी ३८८
आई तूं हवीस हवीस जन्मोजन्मी
असा अभागी ग कोण नको म्हणेल सुधा-उर्मी ३८९
आई तूं हवीस हवीस जन्मवेरी
सांग कोण कंटाळेल अमृताच्या ग सागरी ३९०
आई तूं हवीस कशी पुरेशी होशील
असा कोण ग करंटा माऊलीला कंटाळेल ३९१
माऊली असावी रानीच्या पाखरांना
चोचीने त्यांना चारा भरवीते ३९२
माऊली असावी मोठ्याच्या वासराला
अंग चाटायला पान्हावोनी ३९३
माउली असावी पिलापाखरांना
मुलावासरांना संसारात ३९४
फुलांमध्ये फूल फूल हुंगावे जाईचे
सुख भोगावें आईचे बाळपणी ३९५
फुलांमध्ये फूल फूल हुंगावे चाफ्याचें
सुख भोगावे बापाचे बाळपणी ३९६
फुलांमध्ये फूल फूल शोभते कमळाचे
आईच्या प्रेमाचे माप नाही ३९७
गायीचा की डुबा गोठणीये उभा
माउलीच्या लोभा मीत नाही ३९८
माउलीचे कष्ट कुठे रे फेडू देवा
तळहाताचा पाळणा नेत्रींचा केला दिवा ३९९
बापाचे उपकार फिटती काशी गेल्या
माउलीचे उपकार फिटती ना काहीं केल्या ४००