माउलीची माया शेजी करायला गेली
गुळाची ग गोडी साखरेला नाही आली ४०१
माउलीची माया नाही येत आणीकाला
कोवळया माणीकाला रंग बहू ४०२
धन ग संपदा आग लागो त्या वस्तेला
माझ्या बाळाच्या ग संगे उभी राहीन रस्त्याला ४०३
धन ग संपदा नाही मला ती लागत
तुझ्या जीवाचे अगत्य तान्हेबाळा ४०४
नदी वाहे झुळझुळ परी पाण्यावीण मासा
जीव माझा तोळा मासा बाळावीण ४०५
जेथे तान्हेबाळ तेथे माउलीचा स्वर्ग
तान्हेबाळावीण कडू वीख सुखभोग ४०६
देवाच्या देवळांत उभी मी जागत्ये
आयुष्य मागत्ये तान्हेबाळाला ४०७
देवाच्या देवळात करिते मी धांवा
पुत्र माझा व्हावा शतावंत ४०८
तुळशीच्या पाशी सांजवात मी लावीते
आयुष्य मागते तान्हेबाळा ४०९
अतिथीला अन्न गायीला चारा
आयुष्य लेंकराला देवे द्यावे ४१०
माउली रागावली रागांत लोभ तीचा
असे गोळा ग पोटीचा तान्हेबाळ ४११
माउलीचा मार त्यांत अमृताचा चारा
बाळाच्या कल्याणाच्या त्यांत कोटी कोटी धारा ४१२
माउलीचा मार नसे पंतोजीसारखा
माउली मायेची असे पंतोजी पारखा ४१३
समुद्राचे पाणी अहोरात्र उचंबळे
माऊली तळमळे बाळासाठी ४१४
समुद्राचे पाणी अहोरात्र नाचे
तसे चित्त माउलीचे बाळासाठी ४१५
समुद्र उचंबळे होता चंद्राचे दर्शन
माउली ग हेलावते होता पुत्राचे स्मरण ४१६
किती ओव्यांमध्ये गाऊं मी ग माऊलीचे ऋण
हे ग कोणा मोजवती वाळवंटातील कण ४१७
किती ओव्यांमध्ये गाऊ माऊलीच्या मी गुणाला
या ग सागराच्या लाटा मोजवतील कुणाला ४१८
किती ओव्यांमध्ये गाऊ माऊलीच्या मी प्रेमाला
कोण प्रदक्षिणा घाली आकाशाच्या ग सीमेला ४१९
माउलीची माया कुणा ग वर्णवेल
प्रत्यक्ष भागेल ब्रह्मदेव ४२०