असे जरी असले तरी आईची इच्छा मुलगी चांगल्या घरात पडावी, दागदागिने अंगावर पडावे. गडी माणसे कामाला असावीत अशी असते :
शेरभर सोने गोठाभर गाई
तेथे आमुची उषाताई देऊ करा ॥
ज्याच्या घरी हत्ती घोडे ज्याच्या घरी कुळंबिणी
तेथे देऊ हिरकणी उषाताई ॥
नवरी मुलगी कशी आहे ऐका :
नवरी पाहूं आले सोपा चढून आंगणी
नवरी शुक्राची चांदणी उषाताई ॥
नवरी पाहूं आले काय पाहतां नवरीस
माझी लाडकी ही लेक सोने जणू मोहरीस ॥
नवरी पाहूं आले सोपा चढून माडी गेले
नवरी पाहून दंग झाले उषाताई ॥
नवरी पाहून झाल्यावर शेवटी हुंडयाच्या गोष्टी निघतातच :
मुलीच्या रे बापा हुंडा द्या पांच गाडया
शालूच्या पायघडया पाहिजेत ॥
परंतु एक श्रुतिस्मृतिशास्त्रज्ञ गृहस्थ म्हणतो :
गृहस्थ व्याहीया हुंडा दे पांच गायी
लेकुरवाळा व्याही मामाराया ॥
पाच गायीच नवरदेवाला द्या. मोठे घर आहे. मुलेबाळे आहेत. दूधदुभते होईल.
लग्न ठरते. तयारी होऊ लागते. घरात दळण पापड होऊ लागते :
जाते घडघडे उडीदाच्या डाळी
पापडाचे दळी अक्काबाई ॥