दळण दळतांना ओव्या म्हणतात :

वाटेवरलें घर             ओवियांनी गर्जे
लगीनघर साजे                 बाप्पाजींचे ॥

लग्नासाठी तेलफळाचे, रूखवताचे लाडू तयार करावयाचे असतात. हे लाडू कोणी वळावे ? ज्यांना सासूसासरे आहेत, अशा भरलेल्या घरातील बायकांनी लाडूला हात लावावे :

सासूसासर्‍यांची             येऊ द्या मांडवा
हात लागू दे लाडवा             शांताताईचा ॥
सासूसासर्‍यांच्या         बोलवा पांचजणी
नवरा आहे देवगणी             गोपूबाळ ॥

लग्नाचा मांडव घालायचा, त्याचे वर्णन सुंदर आहे. एका ओवीत मुक्तेश्वराप्रमाणे विशाल प्रतिमेचे वर्णन आहे :

मांडव घातला             पृथिवीचा मेज
लेकी कन्यादान तुझे             उषाताई ॥

अहेर देतात घेतात. नवरी मुलगी असते लहान. ती बिचारी थकून जाते :

अक्षतांनी जड झाला         उषाताई तुझा माथा
अहेर देतां घेता             दमलीस ॥

पुढे नवरा मुलगा निघतो. हत्तीवर अंबारीत तो असतो. सर्वत्र उजेड पडतो. नवरदेवाची प्रभा फाकते :

नवरा मुलगा             हत्तीवर चढे
दोन्ही बिदी उजेड पडे             चकचकाट ॥

लग्नाच्या सोहळयाचे वर्णन सुरेख आहे. मैत्रिणी सांगतात :

वाजत गाजत             आले गृहस्थाचें बाळ
ऊठ सखे घाल माळ             उषाताई ॥

लहानशी नवरी. ती थरथरत असते. परंतु पाठीशी मामा असतो :

लग्नाच्या वेळे             नवरी कांपे दंडाभुजा
पाठीशी मामा तुझा             उषाताई ॥
लगीनाच्या वेळे             नवरी कांपते दंडांत
साखर घालावी तोंडात             उषाताईच्या ॥

वधूवरे परस्परांस माळ घालतात. मग होम, सप्तपदी वगैरे प्रकार. लहानपणी मुलगी दमून जाते. ती रडवेली होते :

मंत्र उच्चारिती             चाललासे होम
डोळया जातो धूर             उषाताईच्या ॥
कोंवळी सांवळी             जशी शेवंतीची कळी
दमली भागली                 उषाताई ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel