सासरच्या मंडळीस आई म्हणते :
पदरी घातला पोटचा मी हो गोळा
भरून येतो डोळा माय म्हणे ॥
शेवटी गाडी निघते. नवरी मुलगी मागे पाहात असते :
सासरी जातांना बघते मागेपुढे
जीव गुंते आईकडे उषाताईचा ॥
भाऊ दुरून खुणावीत असतो :
सासरी जातांना गाडी लागे चढणीला
ये हो म्हणे बहिणीला भाईराया ॥
सासरी जातांना डोंगर आले आड
जातांना उषाताईला मागे पाहून येती कढ ॥
आईबापांना कसे कसे होते. मुलीपेक्षा आता मुलीच्या सौभाग्याची काळजी वाटू लागते. मुलगीचा पती सुखी असणे म्हणजे मुलगी सुखी असणे. मातेचे हे परमोदार उद्गार ऐका :
माझे हे आयुष्य उणे करी रे गणया
घाल सखीच्या चुडेया उषाताईच्या ॥
बापाला उद्देशून लोक म्हणतात :
लेकीच्या रे बापा धन्य धन्य तुझी छाती
काळजाचा घडा देतोस परक्या हाती ॥
बापही विरघळतो :
बाप म्हणे लेकी साखरेचा घडा
जाशी परघरा जीव होई थोडाथोडा ॥
गाडी दिसत नाही. बैलाच्या घंटांचा आवाजही हवेवर विरून जातो :
गाडी आड गेली दिसेना नयनांला
माहेरच्या मंडळीच्या पाणी लोटले डोळयांला ॥
गाडी आड गेली ऐकूं न येई कांही
परतती मायबाप परते रडत भाई ॥
लोक आईबापांना शांत करतात. आईबापच हौसेने लग्न करतात. परंतु मुलगी सासरी जायला निघाली की तेच कष्टी होतात:
संसारी सुखांत आहे दु:ख मिसळलें
लगीन थाटाने करिती परि डोळयां पाणी आलें ॥
सारांश काय, तर-
सुखामध्ये दु:ख दु:खामध्ये सुख
असे संसारी कौतुक देवाजीचे ॥
अशा रीतीने मुलगी सासरी जाते. संसार पुढे सुरू होतो. संसारातील ते बरेवाईट अनुभव पुढील प्रकरणी :