कन्यादान करुनी बाप बोले पांच गायी
चुलता बोले उषाताई अर्धे राज्य १६१
कन्यादान करुनी कन्या एकीकडे
पृथ्वीदान घडे काकारायांना १६२
कन्यादाना वेळे कन्या उच्चारिली
बापे पाचारिली उषाताई १६३
मंडप भरला जमले छोटे मोठे
लगीन होतें थाटे उषाताईचे १६४
मंडप भरला लागे पागोटया पागोटें
लगीन होते थाटे उषाताईचें १६५
भिक्षुकांची दाटी मांडवांत झाली
लगीनाची वेळ झाली उषाताईच्या १६६
गोरज मुहूर्त मुहूर्त पवित्र
उच्चारिती मंत्र ब्रह्मवृंद १६७
मंगल अष्टके भट भिक्षुक म्हणती
होतसे शुभ वृष्टी अक्षतांची १६८
लगनाच्या वेळे अंतरपाटाला दोरवा
मामा सरदार बोलवा उषाताईचा १६९
लग्नाच्या वेळे नवरी कांपे दंडाभुजा
पाठीशी मामा तुझा उषाताई १७०
लगनाच्या वेळे नवरी कांपते दंडात
साखर घालावी तोंडात उषाताईच्या १७१
लगनाच्या वेळे नवरी कांपे थरथरा
मामा येऊं दे घरा उषाताईचा १७२
वाजंत्री वाजती फुलती फुलबाजा
उषाताई कोणा राजा माळ घाली १७३
रुपयांची वाटी बोहल्याच्या कोना
तुझ्या वराला दक्षिणा उषाताई १७४
वाजवा वाजवा वाजवा झाली वेळ
घालती गळा माळ वधूवर १७५
कडका उडाला घोष जातो अंबरांत
गर्दी उडे मांडवांत बाप्पाजींच्या १७६
ताशे तडाडती उडती किती बार
सोहळा होतो थोर लगीनाचा १७७
सनया सुस्वर धिमधिम चौघडे वाजती
शिंगे जोराने फुंकती शिंगवाले १७८
पानसुपारीची अत्तरफुलांची
तबके चांदीची झळाळती १७९
आणिती साखरा तबकी भरभरून
गर्दीत घुसून वांटतात १८०