नळे चंद्रज्योती त्यांची झांकतसे प्रभा
वरातीसाठी निघा लाग वेगे २२१
नवरानवरी बैसली पालखींत
फुले उधळित हौसेसाठी २२२
हत्तीच्या सोंडेवरी शोभे मोतीयांची जाळी
वर बैसली सांवळी उषाताई २२३
नक्षत्रासारखे हे ग दीप झळाळति
झाल ओवाळिती वधूवरा २२४
हत्तीच्या सोंडेवरी मोतीयांची झाल
वर शोभे बाळ भाग्यवंत २२५
माहेर तुटले सासर जोडले
नांव नवीन ठेवीले उषाताईला २२६
माउलीच्या डोळां घळकन पाणी आलें
नांव हो बदलीलें उषाताईचें २२७
सासूसासर्यांच्या वधूवरे पाया पडती
आशीर्वादा मिळवीती वडीलांच्या २२८
जवळी घेऊनी बैसवीती मांडी
घालतात तोंडी साखरेला २२९
पाठीराखी कोण जाईल बरोबर
सांभाळील अष्टोप्रहर उषाताईला २३०
नको नको रडूं पाठीराखीणीला धाडूं
आसवे नको काढूं उषाताई २३१
नको नको रडूं पाठीराखीण येईल
प्रेमे तुला समजावील उषाताई २३२
नको नको रडूं सत्वर तुला आणू
डोळयां नको पाणी आणूं उषाताई २३३
काळी कपिला गाय अपुल्या कळपा चुकली
मला मायेने टाकीली परदारी २३४
काळी कपिला गाय रेशमी तिला दावे
आंदण मला द्यावें बाप्पाराया २३५
नऊ मास होत्यें मायबायेच्या उदरी
आता मी परघरी लोक झाल्यें २३६
नऊ मास होत्यें मायबायेच्या पोटात
चिरंबेदी कोटांत वस्ती केली २३७
नऊ मास होत्ये माउलीच्या डाव्या कुशी
उणे उत्तर बोलू कशी मायबाईला २३८
नऊ मास होत्ये कळकीच्या बेटा
कन्येचा जन्म खोटा मागीतला २३९
सासरी जातांना डोळयांना येते पाणी
सखा भाईराया पुसून टाकीतो शेल्यांनी २४०