लेकीच्या बापाचे धन्य धन्य हो धारिष्ट
लेक देऊनीया केला जावई वरिष्ठ २६१
आयुष्य चिंतीते परक्याच्या पुत्रा
सखे तुझ्या मंगळसूत्रा उषाताई २६२
आयुष्य चिंतीते परक्या मुलास
सखे तुझ्या कुंकवास उषाताई २६३
आयुष्य मी चिंती परक्या ब्राह्मणा
सखी तुम्हां दोघाजणां उषाताई २६४
आयुष्य मी चिंती लेकी आधी जांवयाला
माउलीचे सुख तुला उषाताई २६५
माझे हे आयुष्य उणे करी रे गणया
घाल सखीच्या चुडेयां उषाताईच्या २६६
होऊन लगीन कन्या सासरी निघाली
संसाराची यात्रा निराळी सुरू झाली २६७
होऊन लगीन निघाली पतिघरी
होई कावरीबावरी उषाताई २६८
बापाने दिल्या लेकी जन्माच्या सांठवल्या
ब्रह्माने गांठी दिल्या जन्मवेरी २६९
निघालीसे गाडी संसारा सुरवात
सखीचे मंगळसूत्र मंगल करो २७०
निघालीसे गाडी होवो संसार सुखाचा
माझ्या तान्ह्या ग बाळीचा उषाताईचा २७१
गाडी आड गेली दिसेना नयनांला
माहेरच्या मंडळींच्या पाणी लोटले डोळयांला २७२
गाडी आड गेली घंटेचा येई नाद
त्याचा ऐके पडसाद भाईराया २७३
गाडी आड गेली येतो खडखड आवाज
आता भाईरांया घरी जायाला रे नीघ २७४
गाडी दूर गेली ऐकूं ना येई काही
परतती मायबाप परते रडत भाई २७५
लोक बोलताती नका करूं कांही चिंता
लेक दिली भाग्यवंता बाप्पाजींनी २७६
लोक बोलताती नका आता रडूं
लेक लाडकी तुमची आता भाग्यावर चढूं २७७
लोक समजावीती मायबाप झाले शांत
परी आतून मनांत कढ येती २७८
संसारी सुखांत आहे दु:ख मिसळलें
लगीन थाटाने करिती परि डोळयां पाणी आलें २७९
सुखामध्ये दु:ख दु:खामध्ये सुख
असे संसारी कौतुक देवाजीचें २८०
गणया रे देवा कर सखीचं चांगलं
आई सारं रे मंगल तुझे हातीं २८१