सकाळी उठून सडा घालू गोमूत्राचा
माझ्या ग कंथाचा वाडा आहे पवित्राचा ४१
सकाळी उठून काम करित्ये घाईघाई
माझ्या दारावरनं मंदिराची वाट जाई ४२
सकाळी उठून सूर्याला हात जोडी
कपाळी रेष ओढी कुंकवाची ४३
सकाळी उठून कामधंद्याला लागल्यें
सूर्याला विसरल्यें नमस्कार ४४
सकाळी उठून सूर्याला नमस्कार
मग करीत संसार उषाताई ४५
मला शिकविले बयाबाई माउलीनें
असे उभें राहूं नयें परक्याच्या साउलीने ४६
मी ग शिकलेली बयाबाईच्या शाळेला
काम आपुले करावें सदा वेळच्या वेळेला ४७
माळयानें मळयांत पेरीले उगवलें
माय ग माउलीनें शिकवीलें कामा आलें ४८
मला शिकवीलें बाप्पाजी ज्ञानवंता
भरल्या पाणवठा जाऊं नये ४९
मला शिकवीलें माय त्या माउलीनें
परक्याच्या साउलीने जाऊं नये ५०
दळण सडण नित्य माझें ग खेळणें
माझ्या मायेनें वळण लावीयेलें ५१
दळण मी दळी माझ्या बाह्या लोखंडाच्या
माय ग माउलीनें मुळयाचारिल्या वेखंडाच्या ५२
दळण सडण नित्य माझें ग खेळणें
दूर पाणीयाला जाणें अवघड ५३
दळण दळतांना अंगाच्या झाल्या गंगा
माय माउलीने मला चारिल्या लवंगा ५४
दळण दळावें जसा चंदन खिसावा
माउलीला ग पुसावें कसा परदेश कंठावा ५५
नाकींच्या नथीला नको लावूं टीकफुली
आपण गृहस्थाच्या मुली उषाताई ५६
परके पुरुषाचा नको घेऊं कातचुना
आपण गृहस्थाच्या सुना वैनीबाई ५७
परके पुरुषाशी नये बोलूं एकाएकी
आपण गृहस्थाच्या लेकी उषाताई ५८
किती मी सांगू तुला एवढा पदर घे अंगावर
परक्या ग पुरुषाची नजर असते दूरवर ५९
किती तूं नटशील एवढे नटून काय होतें
रुप सुंदर कोठे जातें उषाताई ६०