माझे घर मोठे हंडे घंघाळांचे
वडील मामंजींचे नांव मोठें १६१
माझे घर मोठे धुराचा कोंडमार
कोमेजली सुकुमार उषाताई १६२
माझे घर मोठे हिंडती दारी गडी
भरली मोठी माडी पाहुण्यांनी १६३
माझे घर मोठे पन्नास बाहालांचें
पाहुण्याउण्यांचे वावरण १६४
माझे घर मोठे पन्नास येती जाती
हाती रुपयांची वाटी गोपूबाळाच्या १६५
मोठ मोंठे लोक उठून उभे राहती
लोडाशी जागा देती माझ्या बाळा १६६
मोठ मोठे लोक सामोरे येतात
स्वागत करितात माझ्या बाळाचें १६७
मोठ मोठे लोक सरकारे अडवीले
एक्या शब्दें सोडवीले माझ्या बाळें १६८
कचेरीच्या पुढें हिरवा कंदील डोलतो
नवा साहेब बोलतो माझा बाळ १६९
कचेरीच्या पुढे हिरवा कंदील कोणाचा
नवा साहेब पुण्याचा माझा बाळ १७०
कचेरीच्या पुढें काय गुलाबा तुझी हवा
वास घेणारे गेले गांवा दादाराया १७१
बारा बैल वहाती एवढा कोण शेती
चार गावांची ग खोती गोपू बाळाची १७२
बारा ग बैलांची दावण आली घरा
निजला जागा करा गोपूबाळ १७३
बारा बैल वहाती बाप्पाजींच्या नांगराला
जिरेसाळ डोंगराला पेरीयेली १७४
आवाज मोठा आला मोठा गाडा धडधडला
खोतीचा गल्ला आला बाप्पाजींचा १७५
बाप्पाजी काकाजी करा भाताचा व्यापार
मोत्यांचा चंद्रहार द्यावा मज १७६
नाचण्यांनो तुम्ही कोकणींचे राजे
त्याने भाई माझे सावकार १७७
नाचण्यांनो तुम्ही कोकणीचे गहूं
अंतर नका देऊं भाईरायाला १७८
सभेमध्ये ग बसले उंच पगडी लहानथोर
सभेमध्ये माझे दीर शोभतात १७९
पशाने पायली सवाईची दिढी झाली
कंठी छातीला भीडली दादारायांच्या १८०