हाती कांकण पाटल्या जवे दोरे गजरे गोट
सुभेदारिणी तुझा थाट उषाताई २८१
कशीद्याची चोळी अंगी झाली तंग
सखी चवळीची शेंग उषाताई २८२
मोठे मोठे डोळे हरिणीबाईंचे
तसे तुझ्या रे आईचे गोपूबाळा २८३
ठुशा टीकांखाली सरीबाई तूं दोराची
राणी जहागीरदाराची उषाताई २८४
जोडव्यां झणत्कार बिरवल्यांना बारा ठसे
चालतांना रुप दिसे उषाताईचें २८५
कशीद्याची चोळी अंगी की फाटली
सखी सासर्या भेटली उषाताई २८६
ठुशा पेट्यांखाली कंठीचे झालें पाणी
मागते तन्मणी उषाताई २८७
ठुशापेट्यांखाली कंठ्याचे झालें जाळें
मागते तायतळें उषाताई २८८
उठा उठा जाऊबाई दिवा लावावा तुपाचा
दारी पलंग रुप्याचा भावोजींचा २८९
उठा उठा जाऊबाई दारी उजाडलें
आपल्याला वाण आलें हळदीकुंकू २९०
उठा उठा जाऊबाई रथाचें धरूं चाक
शंभरी करूं आंख चुडे्यांना २९१
उठा उठा जाऊबाई रथाची धरूं दोरी
शंभरी करूं पुरी चुडे्यांना २९२
सहांच्या पंगतीला पितांबरांचे झळाळ
तूप वाढते वेल्हाळ उषाताई २९३
सहांच्या पंगतीला कशाला हव्या तिघी
आपण वाढूं दोघी उषाताई २९४
सहांच्या पंगतीला नको भिऊं परातीला
येतें तुझ्या संगतीला उषाताई २९५
माझ्या दारावरनं कोण गेला झपाट्याचा
कुसंगी पागोट्याचा अप्पाराया २९६
माझ्या दारावरनं कोण गेली पातळाची
गळां माळ पुतळ्यांची उषाताई २९७
माझ्या दारावरनं मुलांचा मेळा गेला
त्यांत मी ओळखीला गोपूबाळ २९८
माझ्या दारावरनं हळदी कुंकवाचा नंदी गेला
खडा मारून उभा केला भाईरायांनी २९९
पुतळ्यांची माळ गोपूबाळाच्या नारीला
सून शोभते गौरीला आक्काबाईला ३००