माहेरी जाईन बसेन अंगणी
जशा लवती कामिनी भावजया ४०१
अंगणात खेळे दणाणली माझी आळी
लेंकुरवाळी आली माहेराला ४०२
जेवण मी जेवी भाजीभाकरीचे
मायेच्या हातींचे गोड लागे ४०३
जेवण मी जेवी जेवण जेवतें पोळीचें
पाणी माहेरच्या गावींचे गोड लागे ४०४
माहेरच्या वाटे मऊ गार हरिक दाटे
सासरच्या वाटे टोंचती कुचकुच काटे ४०५
जाईन माहेरी बसेन खांबापाशीं
धाकट्या भावापाशी गुज बोलूं ४०६
जाईन माहेरी बाप्पाजींच्या घरा
घुसळीन डेरा अमृताचा ४०७
जाईन माहेरी पदर घेईन पुरता
सभे बैसला चुलता काकाराया ४०८
जाईन माहेरी पदर घेईन दोन्ही भुजा
वडीलांपरिस धाक तुझा काकाराया ४०९
जाईन माहेरी बैसेन बाजेवरी
विसावां तुझे घरीं माउलीयें ४१०
जाईन माहेरी बैसेन मी खाटे
विसावा मला भेटे माहेरास ४११
मजला माघारी तुजला कां न ये
जोडीनें जाऊं सये माहेराला ४१२
मजला माघारी मदनाचे घोडे
सदनाचें पुढें गोपूबाळ ४१३
काळी चंद्रकळा धुऊन धुऊन वीटली
नाहीं हौस फिटली माहेराची ४१४
दळण मी दळी हळदीवीण फिक्कें
मायेवीण सख्खे कोणी नाही ४१५
बाप्पाजींच्या ग बहिणी नको बोलूं तुझे माझे
एक माहेर तुझे माझे आत्याबाई ४१६
माहेरीचा देव कशाने ओळखावा
निशाणी मोती लावा सोमेश्वराच्या ४१७
माहेरीचा देव तुझा माझा एक
पूजा बांधूं समाईक आत्याबाई ४१८
बाप तो ईश्वर मायबाई काशी
नंदी आहे पायापाशीं भाईराया ४१९
आजोळच्या ओटीवरी आजीबाई बसे
घराला शोभा दिसे मामारायांच्या ४२०