सूर्याच्या समोर माझ्या अक्काबाईचें घर
ओसरीला दार चंदनाचें ५४१
जीव माझा गेला चोळी पातळ दांडीवरी
जीव गेला मांडीवरी भाईरायांच्या ५४२
राखी राखी देवा दिव्यांतला दीपक
माझ्या भाई रायाचा एक गोपूबाळ ५४३
राखी राखी देवा दिव्याची की ज्योत
माझ्या भाईरायाची लेक उषाताई ५४४
नेसा माझ्या वैनीबाई हिरवा शालू कमळाचा
कडे पुत्र जावळाचा चंदूबाळ ५४५
काय सांगू बाई भाईयाचा खोली माचा
किल्ल्या कुलपाचा दरवाजा ५४६
सोंगट्या खेळतांना फांसे आले हारी
मामा तुझें रे कैवारी गोपूबाळा ५४७
देवाचें देऊळीं रुद्रजप पारायण
कंथ तुझा नारायण उषाताई ५४८
नाकीची ग नथ पडली ताकांत
मामारायांच्या धाकांत मामीबाई ५४९
माझ्या घरी ग पाहुणा मांडा करीन साईचा
आला माझा मामाराया भाऊ माझ्या ग आईचा ५५०
माझ्या घरी ग पाहूणी करीन करंजी
आली माझी मावशीबाई बहीण माझ्या ग आईची ५५१
एका छत्रीखाली मामाभाचे चौघेजण
धाकुट्याला लिंबलोण मधुबाळाला ५५२
धाडा माघारी पाहुणा साखर-साईचा
भाऊ माझ्या हो आईचा मामाराया ५५३
चल शिंगीबाई तुझी चाल पाणेयाची
वर स्वारी तान्हेयाची मधुबाळा ५५४
नदीपलीकडे शालूच्या त्या कोण
लेक माझी तुझी सून सखी दोघ्या ५५५
पायां पडूं आला भावजयांचा घोळका
त्यांत धाकुटी ओळखा अप्पारायांची ५५६
पायां पडूं आली आशीर्वाद काय देऊं
जन्मसावित्री पुत्र होऊं उषाताईला ५५७
पायां पडूं आली आशीर्वाद काय द्यावा
अक्षयी चुडा व्हावा उषाताईचा ५५८
पायां पडूं आली भाचेसून माझी
राजसा राणी तुझी गोपूबाळा ५५९
माझ्या अंगणांत चांदीचे फुलपात्र
संध्येला झाली रात्र बाप्पाजींच्या ५६०