मोठी मोठी मोती रामरायाच्या पलंगाला
राणी मागे लवंगाला सीतादेवी १६१
मोठी मोठी मोती रामरायाच्या जोडयाला
राणी मागते तोडयाला सीतादेवी १६२
राम रथामध्यें लक्षुमण घोड्यावरी
मधून जाते डोली जानकीची १६३
सीतेला डोहाळे रामाला काय कळे
निंबोणी रस गळे शेल्यावरी १६४
सीतेला डोहाळे रामाला सांगावे
रुमाली आणावे बाळआंबे १६५
सीता वनवासी दगडाची केली उशी
अंकुश बाळ कुशी वाढतसे १६६
सीता वनवासी दगडाची केली उशी
एवढया अरण्यांत तिला झोंप आली कशी १६७
सीता वनवासी वनी कंटकांची दाटी
पांच महिन्यांचा अंकुश बाळ पोटीं १६८
सीता वनवासी दगडाची करी गादी
एवढया अरण्यांत तिला झोंप आली कशी १६९
सीता वनवासी दगडाची केली बाज
अंकुश बाळ नीज वनामध्यें १७०
पांच महिन्यांचा अंकुश असे पोटी
घोर अरण्यांत सीतामाई केर लोटी १७१
बाण्याच्यामागे बाण बाण येती मागें-पुढें
रामाच्या बाणांचे लवांकुशा कडी-तोडे १७२
बाणांमागें बाण बाण येती ग पीवळे
रामाशी लढती लवांकुश ग कोवळे १७३
बाणांमागे बाण बाण येती झराझरा
रामाच्या बाणांचा लवांकुशा कडदोरा १७४
सीतेला सासुरवास असा केला केसोकेसी
सीता गेली निजधामा तिने वांटला देशोदेशी १७५
सीतेला सासुरवास असा केला परोपरी
सीता गेली निजधामा तिने वांटला घरोघरी १७६
सीतेला वनवास कैकयीनें नेली फणी
तिनें बारा वर्षे वेणी वर्ज्य केली १७७
सीतेला सासुरवास कैकयीनें केला
बारा वर्शे दिला वनवास १७८
सीतेला डोहाळे कैकयीने केले
राम नाही दाखवीले बारा वर्षे १७९
सीता सांगे कथा आपल्या कर्माची
पापिष्टा रावणाची लंका जळली १८०