अलीकडे नाशीक पलीकडे रामराजा
मधून ओघ तुझा गोदाबाई १२१
गंगाबाई आली चौदा कुंडे ती वहात
यात्रा येतसे धांवत राजापूरा १२२
गंगाबाई आली चौदा कुंडें ती भरून
यात्रा येतसे दुरून राजापूरा १२३
गंगाबाई आली तळकातळ फोडून
राजापुराला वेढून वस्ती झाली १२४
आल्या गंगाबाई वडाच्या बुंध्यांतूनी
चौदाही कुंडांतूनी प्रकटल्या १२५
कोळथर्या कोळेश्वर दाभोळे दाभोळेश्वर
पंचनदी सत्तेश्वर ज्योतिर्लिंग १२६
मुंबईची मुंबादेवी तिची सोन्याची कंबर
निरी पडलीं शंभर पैठणीची १२७
मुंबईची मुंबादेवी तिची सोन्याची पायरी
निरी पडली बाहेरी पैठणीची १२८
मुंबईची मुंबादेवी तिची सोन्याची पाटली
सारी मुंबई बाटली काय सांगू ! १२९
मुंबईची मुंबादेवी तिची सोन्याची पायरी
सव्वा लक्ष तारूं उभे कोटाच्या बाहेरी १३०
मुंबई मुंबई सारी मुंबई रांगडी
केरव्यावांचून कोणी भरीना बांगडी १३१
मुंबईच्या बायका आहेत आळशी
नळ नेले चुलीपाशी इंग्रजांनी १३२
मुंबई शहरांत घरोघरी नळ
पाण्याचे केले खेळ इंग्रजांनी १३३
बडोदे शहरांत पाडीले जुने वाडे
मोठया ग रस्त्यांसाठी नवे लोक झाले वेडे १३४
राणीच्या हातींचा राजा झाला ग पोपट
वाडे पाहून बडोद्या रस्ते केले ग सपाट १३५
बडोदे शहरांत वडांची थंड छाया
प्रजेवर करती माया सयाजीराव १३६
बडोदे शहरांत जो जो दिसे वाडा पडका
तो तो ग पाडून केल्या लांब रुंद सडका १३७
सयाजी महाराज बडोद्याचे ग धनी
राज्यकर्ते अभिमानी जनतेचे १३८
बडोदे वाढलें रस्ते नि इमारती
डोळे दीपवीती पाहणारांचे १३९
पन्नास पाकळी गुलाबाच्या फुला
लक्षुमण झोला पाहण्याजोगा १४०