टाटाचे हे वर्णन ऐका :
पैसेवाला मोठा मुंबईचा टाटा
मुळशीवर वरवंटा फिरवीला
आणि महर्षी सेनापती बापट ! पाण्यात बुडणार्या मुळशीची जमीन कोण वाचवणार ! पूर्वी पृथ्वी बुडत होती तेव्हा देवाने वराह अवतार धरून दातांनी पृथ्वी वर ओढली. परंतु आज कोण घेणार अवतार ? सेनापती बापट यांचे नांव पांडुरंग. हा पांडुरंग वराहावताराप्रमाणे उभा राहिला :
बुडत्या धरणीला पांडुरंग ग वराह
मुळशींत मोठा मांडीती सत्याग्रह
आणि सर्व हिंदुस्थानाला हलवणारी महात्माजींची चळवळ आली, राजकारण सर्वत्र पसरले. दिवाणखानी राजकारण चव्हाट्यावर आले. लोक स्वराज्याच्या गोष्टी उघडपणे बोलू लागले. गांधीजींनी हिंदुस्थान हे राष्ट्र केले. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष उभे केले. होअरसाहेब म्हणतात, “गांधीच्या चळवळींमुळे आम्ही हिंदुस्थानकडे अधिक आदराने पाहू लागलो.” अशी ती विराट चळवळ, ते महान आंदोलन. स्त्रियांचा आत्मा जागा झाला, तुरुंग म्हणजे घर झाले. भीती गेली. भ्याड झुंजार झाले. बायकांच्या वाणीला पल्लव फुटले. त्यांचे ओखाणे आता साधे नाही राहिले. त्यातून खादी, गांधी, स्वराज्य हे येऊ लागले :
इंग्रजांची नीति फोडा नी झोडा
बाळकृष्णपंतांच्या नेसूं खादीचा धोतरजोडा
किंवा स्वराज्य स्वराज्य म्हणूं लागले सारे
बाळकृष्णपंत जखमी झाले लाठीच्या मारे
असे ओखाणे मुली आपसांत म्हणत. स्त्रिया असे ओखाणे रचीत, फुगड्या खेळतानासुध्दा :
आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या
अंगांत चोळ्या खादीच्या
असे म्हणू लागल्या. ओव्यांतूनसुध्दा ही स्फूर्ती प्रकट झाली:
गांधी जादुगार भ्याडां करी धीट
दास्याचा आणी वीट सर्व लोकां
गांधी हा गारुडी वाजवीतो पुंगी
इंग्रजाला गुंगी तेणे येई
लोक साधे होऊ लागले. यापूर्वीच्या गाण्यांतून लोक फॅशनेबल होऊ लागले. म्हणून बायकांनी टीका केली. घड्याळे आली, घड्याळाचे छेडे लोंबू लागले. जाकिटे आली, गळ्याभोवती उपरणी आली वगैरे टीका बायकांनी केल्या आहेत:
कळीची करणी
झाली धोतराची उपरणी
हे सुंदर गाणे ज्यांनी ऐकिले असेल त्यांना ती टीका माहीत असेल. परंतु गांधी आले, कोटसूट गेले, साधेपणा आला :
जिकडे तिकडे जाहले गांधी गांधी
राहणी होई साधी शिकलेल्यांची
आणि तो मिठाचा सत्याग्रह ! त्याने तर स्त्रियांचा आत्मा खडबडून जागा झाला. महर्षी अण्णासाहेब कर्वे १९३० साली जगत्प्रवास करून परत आले. त्यांनी मुंबईला स्त्रियांच्या प्रचंड मिरवणुकी पाहिल्या. सभोवती पोलिस आहेत परंतु बायका कडेवरून समुद्राचे पाणी कायदेभंग करून नेत आहेत, राष्ट्रीय गाणी गात आहेत. ते रोमहर्षक दृश्य पाहून स्त्रियांचा आत्मा जागृत व्हावा म्हणून सारे जीवन देणारा हा थोर पुरुष उचंबळला. ते मजजवळ बोटीत भेटले असता म्हणाले, “ते दृश्य पाहून माझ्या डोळयांचे पारणे फिटले.”
सत्याग्रहाने स्त्रियांची शक्ती जागृत झाली ऐका हे वर्णन :
कुठे या चालल्या हजारों आयाबाया
बंद मीठ लुटावया इंग्रजांचे
बाया झाल्या धीट त्यांची गेली भीति
हातात झेंडा घेती स्वराज्याचा