ऐतिहासिक व देशाच्या : ओव्या
रायगडच्या किल्ल्यावरी सोनियाचा वरवंटा
शिवाजी मराठा राज्य करी १
रायगडच्या किल्ल्यावरी सोन्याचा पाळणा
शिवाजीचा बाळ तान्हा राजाराम २
शिवाजी शिवाजी ऐकून शत्रू पळे
सर्वांचा गर्व गळे नाममात्रें ३
शिवाजी शिवाजी ऐकून शत्रू धूम ठोकी
शिवाजी महाराजांची सत्कीर्ती गावी लोकीं ४
शिवाजी छत्रपती सांबाचा अवतार
मावळे वानर रामरायाचे ५
वानरांकरवी राम रावणा लोळवी
मावळ्यांचा हाती शत्रु शिवाजी बुडवी ६
शिवछत्रपती धन्य ग धन्य राजा
पोटच्या पुत्रापरी पाळीली त्याने प्रजा ७
खाऊच्या निमित्तें बादशाहा फसविले
शिवाजी बसून आले पेटार्यांत ८
शिवाजी राजाचें धन्य ग धाडस
भवानी आईचें तो ग लाडकें पाडस ९
शिवाजी राजाचें धन्य ग धाडस
भवानी मातेस चिंता त्यांची १०
शिवाजीचे किल्ले किल्ले ना, ती तो किल्ली
ज्याच्या हातीं तो जिंकी दिल्ली उत्तरेची ११
शिवाजीचं किल्ले किल्ले चढाया कठीण
मोल प्राणाचें देऊन करी मराठा तन १२
शिवाजीचे किल्ले किल्ले चढाया कठीण
त्याचे मावळे चढती त्यांना दोर ग लावून १३
दळीता कांडीता तान्हें बाळा आंदूळतां
शिवाजी मराठा आठवावा १४
काय सांगूं सखी आले शिवाजीचे लोक
निघून गेले रातोरात झपाट्याने १५
वैरियांच्या हाती शिवराया देई तुरी
वैरियांच्या तोंडी शिवराया घाली भुरी १६
चिमणाजी बाजीराव हे दोघे सख्खे भाऊ
म्हणती वसई घेऊ एका रात्री १७
चिमणाजी बाजीराव दोघा भावांची लगट
शनिवारवाड्यांत हत्ती आला मोठया अंबारीसकट १८
चिमाजीअप्पांनी मसलत केली बाजीरावांनी मोडीली
नवी अंबारी जोडली पुण्यामध्यें १९
चिमणाजी बाजी गेले दुसरे बाजीराव कैसे झाले
सारे पुणें धुंडाळीलें पैशांसाठी २०