करायला लागा शेजी मला बोटवाती
लक्षाला पडती कांही कमी २१
वेंचायला लाग सखी दूरवा ग माते
लक्ष मी वहातें गणेराया २२
वेंचायला लाग नीलवर्णाचीं ग फुले
लक्ष मी बोलल्यें विठ्ठलाला २३
गुढी पाडव्याला उंच गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा २४
गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ २५
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडूं मग प्राप्ति अमृताची २६
गुढी पाडव्याला घरोघरी गुढी
पडूं दे माझी कुडी देवासाठी २७
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी गोपूबाळाची २८
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या २९
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी उषाताईचा ३०
नऊ दिवस नऊ नवरात्र अंबायेचा सोहळा
नऊ दिवस नऊ माळा वाहियेल्या ३१
नऊ दिवस नवरात्र अंबामाय बसे घटी
मोतीयांनी भरा ओटी जोगेश्वरीची ३२
आलें नवरात्र चला पाहूं अंबाबाई
रीघ मंदिरांत नाही भारी गर्दी ३३
आले नवरात्र माळेला फुले आणूं
आरत्या रोज म्हणूं अंबाबाईच्या ३४
नवरात्रामध्यें अंबाबाईचा गोंधळ
भरूं मोत्यांची ओंजळ तिचे पायी ३५
आज मंगळवार देवीचा वार आला
चला शेजी दर्शनाला राऊळांत ३६
आज शुक्रवार देवीचा प्रिय वार
लावूं नका हो उशीर दर्शनाला ३७
नऊ दिवस नवरात्र दहावे दिवशी दसरा
अंबा निघाली उशीरा शिलंगणा ३८
दसर्याचे दिवशीं सोने घेऊनीयां आले
दारीं भाई ओवाळीलें उषाताईनें ३९
दसर्याचे दिवशीं माझ्या ताटामध्यें सोने
ओवाळीतें मी प्रेमाने भाईराया ४०