दसर्याचे दिवशीं आपट्याची लुटालुटी
सारंगी घोडा पिटी गोपूबाळ ४१
नवस मी केला मनांतल्या मनांत
मला पावली जनांत जोगेश्वरी ४२
नवस मी केला नवसाजोगी झाल्यें
नवस फेडूं आले जोगेश्वरीचा ४३
नवस मी केला अंबाबाईला कमळ
परदेशी तूं सांभाळ उषाताईला ४४
नवस मी केला अंबाबाईला ताम्हन
परदेशी गेली लहान उषाताई ४५
नवस मी केला अंबाबाईला कुयिरी
गेली परदेशा दूरी उषाताई ४६
आई अंबाबाई भरत्यें तुझी ओटी
सांभाळ सौभाग्याची पेटी उषाताईंची ४७
आई अंबाबाई खण नारळ ग तुला
राख माझ्या कुंकवाला जन्मवेरी ४८
आई अंबाबाई फुलें तुला सुवासाची
काळजी कुंकवाची माझ्या घेई ४९
आई अंबाबाई पडते पायां लेक
चुडे अभंग राख जन्मवेरी ५०
आई अंबाबाई तुला सात नमस्कार
कृपा करी कंथावर उषाताईच्या ५१
शेरा सोनीयाची अंबाबाई पागोट्यांत
राख माये परदेशांत भाईरायाला ५२
शेरा सोनीयाची अंबाबाई घडवीली
देव्हार्या चढवीली बाप्पाजींनी ५३
ऐकावी कहाणी हातीं घ्या तांदूळ
होईल मंगल ऐकणारांचे ५४
नागपंचमीला नागाला घाला दूध
होईल बुध्दि शुध्द नागकृपें ५५
नागपंचमीला पाटावर काढा नाग
आजीबाई कहाणी सांग लहानथोरा ५६
नागपंचमीला लाल ग चंदनी
नाग देतसे काढोनी भाईराया ५७
नागपंचमीला नागाला लाह्या फुलें
सुखानें दोन्ही कुळें नांदतील ५८
नागपंचमीला नागा चंदनाचे गंध
तुटतील भवबंध पूजणारांचे ५९
नागपंचमीला नको चिरूं भाजीपाला
दया शिकवूं हाताला आज सये ६०
नागांची पंचमी गाणी गाऊन जागवूं
दोन्ही कुळांना वागवू आनंदांत ६१
गारुड्याची पुंगी कुठे ग वाजते
शेजीकडे पूजा होते नागोबाची ६२
गारुड्याची पुंगी सखि कुठें ग वाजते
तेथें घेऊन मी जाते तान्हेबाळ ६३
नागपंचमीला बांधीती झाडां झोके
खेळती कवतुकें नारी-नर ६४
चला सखियांनो घेऊं झाडावर झोके
आकाशा देऊ धक्के आपुल्या पायी ६५
नागपंचमीची कोंकणी नाही मजा
झोके घेती कडूलिंबा देशावर ६६
कार्तिक महिना काकड्याची वेळ
तुळशीची माळ विठोबाला ६७
शिमग्याच्या सणा भाऊ माझे खेळी
डफावर जाळी मोतियांची ६८