पहिली माझी ओवी
पहिली माझी ओंवी पहिला माझा नेम
तुळशीखाली राम पोथी वाची १
पहिली माझी ओंवी पहिल्यापासून
आली रथांत बसून अंबाबाई २
पहिली माझी ओंवी वहिला काळा दोरा
लिहिणाराचा हात गोरा राजबिंडा ३
दुसरी माझी ओंवी दूध नाही कोठें
ध्यानी मनीं भेटे पांडुरंग ४
तिसरी माझी ओंवी तीन त्रिकुटाच्या परी
ब्रह्मविष्णुशिवावरी बिल्वपत्र ५
चवथी माझी ओंवी चवथीच्या चंद्रा
मखमली गेंदा रंग बहू ६
पांचवी माझी ओंवी पांच पांडवांना
पाठीच्या भावंडांना राज्य येवो ७
सहावी माझी ओंवी सहावीची छाया पडे
तुझ्या गर्भा तेज चढे उषाताई ८
सातवी माझी ओंवी सात सप्तऋषि
कौसल्येच्या कुशीं रामचंद्र ९
आठवी माझी ओंवी आठ आटेपाटे
देवाजीचे ओटे रंगवीले १०
नववी माझी ओंवी नऊ खंडी गहूं
फेरीला किती घेऊं देवाजीच्या ११
दहावी माझी ओवी दशांगुळे मी गाईन
लक्षुमी होईन संसारात १२
अकरावी माझी ओंवी अकरा हे ग गडू
जेवला बुंदीलाडू गोपूबाळ १३
बारावी माझी ओंवी बारा आदितवार
सूर्याला नमस्कार घालूं केलें १४
तेरावी माझी ओंवी तेरा तेरियाची
पालखी हिरियाची देवाजींची १५
चौदावी माझी ओंवी चौदा चौकड्यांची
पालखी हलकड्यांची देवाजींची १६
पंधरावी माझी ओंवी पंधरा की ग काड्या
रंगवील्या साड्या सीताबाईच्या १७
सोळावी माझी ओंवी सोळा कोशिंबिरी
आज आहे माझ्या घरीं भाऊबीज १८
सतरावी माझी ओंवी सतरा धंदे करूं नये
ऐकावें माझे सये हितासाठी १९
अठरावी माझी ओंवी अठरा धान्यांचे कडबोळें
शेजीशीं बर्या बोलें वाग बाई २०