सतरावी माझी ओंवी सतरावीचें दूध
योगी पीती शुध्द समाधींत ४१
अठरावी माझी ओंवी अठरा पुराणें
लिहिली व्यासानें लोकांसाठी ४२
अठरावी माझी ओंवी अठरापगड जाती
गावांत नांदीती आनंदाने ४३
एकुणिसावी माझी ओंवी एकोणीस वर्षे
नेली मी ग हर्षे संसारांत ४४
विसावी माझी ओंवी विसाण पाण्याचें
निशाण रामाचें उभें केले ४५
विसावी माझी ओंवी वीस मणी खंडी
नास्तिक पाखंडी होऊं नये ४६
एकविसावी माझी ओंवी एकवीस मोदक
तेणे सिध्दिविनायक सुप्रसन्न ४७
पहिली माझी ओंवी पहिला माझा नेम
गायिलें निधान पांडुरंग ४८
दुसरी माझी ओंवी दुजें नाहीं कोठें
पाहीन मी विटे पांडुरंग ४९
तिसरी माझी ओंवी त्रिगुण शरीरा
गाईन सोयरा पांडुरंग ५०
चवथी माझी ओंवी चतुर्भुज मूर्ती
गाईला श्रीपति पांडुरंग ५१
पांचवी माझी ओंवी पांची पराक्रम
गाईन आत्माराम पांडुरंग ५२
सहावी माझी ओंवी सहा मास लोटले
साक्षात भेटले पांडुरंग ५३
सातवी माझी ओंवी सप्त द्वीपांठायी
लक्ष्य तुझ्या पायीं पांडुरंग ५४
आठवी माझी ओंवी अठठावीस युगें
विटेवरी उभे पांडुरंग ५५
नववी माझी ओंवी नवविधा भक्ति
गाईन श्रीपती पांडुरंग ५६
दहावी माझी ओंवी दाही अवतारां
घाली संवसारा तुका म्हणे ५७
चौथी माझी ओंवी चौसंगे दाटली
प्रसंगे भेटली मायबाई ५८
बारावी माझी ओंवी बारा वाटा ग संसारी
आठवा कंसारी भय नाही ५९
तिसरी माझी ओंवी तीन पावली वामन
व्यापितो त्रिभुवन देवांसाठी ६०