अमृत विषाचें विष अमृताचें
ईश्वराच्या इच्छे होत असे ४१
पों पों ग पों पों जशी करते मोटार
तसा जगीं अहंकार प्राणीमात्रां ४२
पों पों ग पों पों मोटार पुढचें पाहीना
तसा कोणा जुमानीना अहंकार ४३
समुद्राच्या कांठी विष्णु मळीतसे माती
ब्रह्मा घडवीतो मूर्ति नानापरीच्या ४४
समुद्राच्या कांठी विष्णु वाळू मळी
घडवी बाहुली ब्रह्मदेव ४५
वेळी सारवावें वेळीच शिवावें
हा ग देह आहे तोच सार्थक करावें ४६
वेळीच जपावें वेळच्या वेळी काम
हा ग देह आहे तोच स्मरूं मनी राम ४७
ज्यांच्या दारी आहे कंदर्पाचें रोप
त्याच्या हातीं सारें पाप जमा होतें ४८
कोणाचें कोण आहे कोण माझा आहे भगवान
शेवटा जाऊं दे मूर्खा तुझा अभिमान ४९
कोणाचें आहे कोण माझा आहे भगवान
त्याच्या ग आधारे जाऊं संसार तरून ५०
संकटांत कामा येई जो मैत्र खरा
अभंग राहे हिरा घाव पडतां ५१
इवलीशी पणती प्रकाशा देतसे
अवलेंसे पुण्य जिवा आधार होतसे ५२
सुंठ घासायाला खापरी येते कामी
जगांत निकामी वस्तू नाही ५३
वरूनी आरशाचें आंत परी भांडे काळें
सर्वच जिवांचे आंत बाहेर निराळें ५४
संकटांत कामा येईल तो खरा
त्याची कास धरा जन्मवेरी ५५
संसारी मानावें लागतें समाधान
सगळें मनीचें होईना कधी कोण ५६
संसारी मानावे लागतें सखी सुख
नाही तर सदा दु:ख चोही बाजू ५७
पिकतात केस गळते बत्तीशी
वासना राक्षशी जैशीतशी ५८
पांढुरले केस परी वासना हिरव्या
कळेना कोणाला त्या कैशा जिरवाव्या ५९
फुलांत सुगंध कमळी मकरंद
हृदयीं गोविंद असो तेवी ६०
नवतीची नार नार चाले दणादणा
नवती गेली निघून माश्या करीती भणाभणा ६१
समुद्रा रे बापा किती करीशी बढाई
नाहीं पाण्याला गोडाई तिळमात्र ६२
गोड बाळपण गेलें बागडोनी
पांखराच्यावाणी सदोदित ६३
मरणाच्या वेळें रामनाम घ्यावें
त्याने मुक्त व्हावें चारी लोकीं ६४
राम राम म्हणा राम साखरेचा खडा
त्याने माझ्या दंतदाढा गोड केल्या ६५
राम राम म्हणा राम साखरेचा खडा
रामाचें नांव घेतां दिवस आनंदांत जावा ६६